नवी मुंबई : सिडकोने दफनभूमीसाठी आरक्षित ठेवलेल्या भूखंडाला घणसोली ग्रामस्थांनी विरोध केला आहे. त्याकरिता ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन मागणीचे निवेदन दिले. तर मंगळवारी विभाग कार्यालयावर मोर्चा काढून पालिका आयुक्तांचीही भेट घेतली होती.घणसोलीत दफनभूमीच्या जागेवरून निर्माण झालेला तिढा सोडवण्यासाठी घणसोली ग्रामस्थांनी मुख्यमंत्र्यांकडे धाव घेतली आहे. त्यांना मागणीचे निवेदन देऊन सिडकोने दफनभूमीसाठी दिलेली सध्याची जागा बदलून ती इतरत्र हलवण्याची मागणी करण्यात आली आहे. सिडकोने घणसोली सेक्टर १८ येथील भूखंड क्रमांक १० हा दफनभूमीसाठी मुस्लीम वेल्फेअर ट्रस्टला ३० वर्षांच्या करारावर दिला आहे. दफनभूमी इतरत्र हलवावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. त्याकरिता घणसोली ग्रामस्थांच्या वतीने २०१२ पासून सिडको व महापालिकेकडे पाठपुरावा सुरू आहे, परंतु येथील जागा बदलण्यात आली नाही. यामुळे संतप्त घणसोली ग्रामस्थांनी मंगळवारी सकाळी पालिकेच्या विभाग कार्यालयावर मोर्चा काढला होता. त्यामध्ये ग्रामस्थ मंडळाचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विभाग अधिकारी दत्तात्रेय नागरे यांना धारेवर धरले. त्यानंतर ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने पालिका आयुक्त रामास्वामी एन. यांची भेट घेऊन आपल्या भावना व्यक्त केल्या.या प्रसंगी चेतन पाटील, तेजस पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, नगरसेवक घनश्याम मढवी, माजी नगरसेवक दीपक पाटील, नगरसेविका सीमा गायकवाड, मोनिका पाटील आदी उपस्थित होते. या वेळी पालिकेच्या वतीने सिडकोला दफनभूमीचा भूखंड बदलण्याचे यापूर्वीच कळवण्यात आल्याचे आयुक्तांनी सांगितले. मात्र, सिडकोकडून प्रतिसाद मिळत नसल्याने दफनभूमीच्या जागेवरून होणारे संभाव्य वाद टाळण्यासाठी योग्य तोडगा काढण्याचेही आश्वासन पालिका आयुक्तांनी दिले.सिडकोविरोधात असंतोषघणसोली सेक्टर-१८ येथील दफनभूमीसाठी दिलेली जागा गावच्या प्रवेशमार्गावरच असल्याने दफनभूमीसाठी इतरत्र भूखंड देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली होती. त्यानुसार तत्कालीन मंत्री गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत घणसोली दर्ग्यालगतची मोकळी जागा दफनभूमीसाठी देण्याची मागणी सिडकोकडे करण्यात आली होती. मात्र, सिडकोने आर्थिक हित साध्य करण्यासाठी दर्ग्यालगतची जागा विकासकांना विकली व दफनभूमीसाठी फॉरेस्टच्या क्षेत्रात येणाऱ्या जागेत प्लॉट तयार करून तो मुस्लीम वेल्फेअर ट्रस्टला देऊन वाद निर्माण केल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे.
दफनभूमीची जागा बदलण्याचे मुख्यमंत्र्यांना साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2019 11:37 PM