नवी मुंबईतील विकास कामांचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 04:02 PM2020-12-24T16:02:52+5:302020-12-24T16:02:55+5:30

CIDCO News: सिडको आणि महापालिकेने समन्वयातून नवी मुंबईचे विकास प्रकल्प वेळेत करावेत -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Chief Minister reviewed the development works in Navi Mumbai | नवी मुंबईतील विकास कामांचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

नवी मुंबईतील विकास कामांचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

Next

 

सिडको आणि महापालिकेने समन्वयातून नवी मुंबईचे विकास प्रकल्प वेळेत करावेत -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

 ठाणे  दि. 24: नवी मुंबईतील विविध विकास कामांचा आढावा आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला. पाम बिच ट्रॅक, ज्वेल ऑफ नवी मुंबई, गवळी देव वन पर्यटन प्रकल्प, ऐरोलीतील धर्मवीर आनंद दिघे मैदान या सारखे प्रकल्प लवकरात लवकर पुर्ण करुन नागरिकांना त्याचा लाभ द्यावा असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
            या बैठकीस नगरविकास मंत्री तथा पालकमंत्री  एकनाथ शिंदे, खासदार राजन विचारे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, मुख्यमंत्री कार्यालयाचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, एमएमआरडीएचे महानगर आयुक्त आर. राजीव, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय मुखर्जी, नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर आदी उपस्थित होते.

            नवी मुंबईतील घनसोली येथे राखीव भुखंडावर आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्पोर्टस कॉम्प्लेक्स बांधण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. यासंदर्भातील तांत्रिक बाजू पूर्ण करुन नवी मुंबई महापालिकेने सिडकोकडे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

            नवी मुंबईला जोडणारा आणि ठाणे-बेलापूर रस्त्याला पर्यायी ठरणारा कोस्टल रोडला जोडणाऱ्या प्रकल्पाच्या  कामाबाबत यावेळी चर्चा झाली.  संपुर्ण नवी मुंबई विमानतळ आणि इतर शहरांना जोडणारा कोस्टल रोड हा प्रकल्प पूर्ण झाल्यास त्यामुळे वाहतूकीचा ताण कमी होईल, असे नगरविकास मंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले.

            घनसोली, ऐरोली उर्वरित रस्त्यावर खाडीपुल बांधण्याबाबतच्या प्रकल्पाचा आढावा यावेळी घेण्यात आला. या संदर्भात सिडको आणि नवी मुंबई महापालिका या दोन संस्थांनी समन्वयातून तांत्रिक बाबी पूर्ण कराव्यात असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. हा महत्वाचा प्रकल्प असून प्रलंबित रस्ता पूर्ण झाल्यास नागरिकांना दिलासा मिळेल.  सीआरझेड आणि कांदळवन महत्वाचा विषय असून कांदळवन सुरक्षित ठेऊन पुढे जाता येईल अशा पद्धतीने काम करण्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

            ऐरोली येथील सागरी जैवविविधता केंद्राचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी वन विभागाच्या माध्यमातून प्रयत्न करावा असे त्यांनी यावेळी सांगितले.

            तुर्भे रेल्वे स्थानकाला जोडणाऱ्या सेक्टर 20 मधील भुयारी मार्गाचे काम एमएमआरडीएच्या माध्यमातून करण्यात यावे. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात  गवळी देव ते सुलाई देवी वन पर्यटनस्थळाला निधी द्यावा. रोपवेची आवश्यकता आहे का याची तपासणी करावी, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

            यावेळी कळवा ऐरोली एलिव्हेटेड प्रकल्प, नवी मुंबईतील भुमिपुत्रांचे प्रलंबित प्रश्न याबाबत चर्चा झाली. या संदर्भात सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांसोबत बैठक घेण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. 

            नवी मुंबईतील 13 रेल्वे स्थानके सिडकोने बांधली आहेत. त्या ठिकाणी लिफ्ट आणि सरकते जिने करण्यासाठी सिडकोने पुढाकार घेण्याबाबत खासदार श्री. विचारे यांनी मागणी केली.यावेळी नवी मुंबई महापालिका आयुक्त श्री. बांगर यांनी नवी मुंबईच्या महत्वांच्या प्रकल्पांबाबत सादरीकरण केले.

Web Title: Chief Minister reviewed the development works in Navi Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.