मुख्यमंत्री सचिवालयाकडे नवी मुंबई महापालिकेशी संबधित सर्वाधिक तक्रारी
By कमलाकर कांबळे | Published: September 12, 2022 04:59 PM2022-09-12T16:59:16+5:302022-09-12T17:01:19+5:30
राज्य शासनाच्या आदेशानूसार २० जानेवारी २०२० रोजी कोकण विभागीय आयुक्त कार्यालयाच्या पहिल्या मजल्यावर मुख्यमंत्री सचिवालय कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.
नवी मुंबई - कोकण विभागीय आयुक्त कार्यालयात स्थापन करण्यात आलेल्या ‘मुख्यमंत्री सचिवालय कक्षाकडेआतापर्यंत १ हजार ४७९ अर्ज प्राप्त झाले असून यात नवी मुंबई महापालिकेशी संबधित सर्वाधिक तक्रार अर्जांचा समावेश आहे. मागील पावणे तीन वर्षात हे सर्व अर्ज निकाली काढल्याची माहिती उपायुक्त महसूल तथा कोकण विभागीय मुख्यमंत्री सचिवालय कक्षाचे पदसिध्द विशेष कार्य अधिकारी मकरंद देशमुख यांनी दिली.
राज्य शासनाच्या आदेशानूसार २० जानेवारी २०२० रोजी कोकण विभागीय आयुक्त कार्यालयाच्या पहिल्या मजल्यावर मुख्यमंत्री सचिवालय कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. ३१ ऑगस्ट २०२२ या कालावधीत या कक्षाकडे कोकण विभागातील विविध क्षेत्रातून १ हजार ४७९ अर्ज व निवेदने प्राप्त झाली आहेत. त्याप्रैकी ५१२ अर्ज क्षेत्रीय कार्यालयांकडे पाठविले आहेत. तर २३० अर्ज मुंबई येथील मुख्यमंत्री सचिवालय कार्यालयाकडे पाठविण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे ७३७ अर्ज विभागीय कार्यालयाच्या माध्यमातून निकाली काढले आहेत. कोकण विभागात एकूण १५२ प्रमुख विभागीय कार्यालये आहेत. त्यापैकी सर्वात जास्त म्हणजे १७३ तक्रारी नवी मुंबई महापलिकेशी संबंधित होते, तर रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाशी संबंधित ११२ अर्ज होते. तसेच सिडको संबंधित १२१ तक्रार अर्जांचा समावेश होता.
सर्वसामान्य माणसाला त्याचे दैनंदिन आणि स्थानिक प्रश्न सोडवण्यासाठी आपले गाव, शहर सोडून मुंबईला यावे लागू नये, त्यांचा वेळ, पैसा आणि श्रम वाचावेत या हेतूने हा कक्ष सुरू करण्यातआला आहे. त्याचबरोबर क्षेत्रिय पातळीवरचे प्रश्न क्षेत्रियस्तरावरच सुटावेत, या प्रक्रियेला वेग मिळावा ही त्यामागची भूमिका आहे. त्यानुसार आता मुख्यमंत्र्यांना संबोधून करण्यात येणारे अर्ज अथवा निवेदने विभागीय मुख्यमंत्री कक्षाकडून स्वीकारून त्यावर कार्यवाही केली जाते, असे मकरंद देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.