प्रचारासाठी बुधवारी मुख्यमंत्री उलवा नोडमध्ये
By admin | Published: February 12, 2017 03:20 AM2017-02-12T03:20:52+5:302017-02-12T03:20:52+5:30
भारतीय जनता पक्ष व भारिप (आठवले गट) यांच्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बुधवार, १५ फेब्रुवारी रोजी
पनवेल : भारतीय जनता पक्ष व भारिप (आठवले गट) यांच्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बुधवार, १५ फेब्रुवारी रोजी उलवा नोड येथे येणार असल्याची माहिती भाजपाचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक २१ फेब्रुवारी रोजी होणार आहे. निवडणुकीसाठी भाजपा व भारिप युतीतर्फे रायगड जिल्हा परिषदेच्या ४४ व पंचायत समितीच्या ९० जागा लढवण्यात येणार आहेत. याबाबत माहिती देण्यासाठी पनवेल येथील मार्केट यार्ड येथील रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात आमदार प्रशांत ठाकूर यांनी पत्रकार परिषद घेतली. या वेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भारिपचे जगदीश गायकवाड उपस्थित होते. १५ फेब्रुवारीला दुपारी २ वाजता उलवा नोडमधील सेक्टर १९मधील भूमिपुत्र भवनाच्या मैदानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा होणार असून या वेळी पालकमंत्री प्रकाश महेता, रायगड जिल्हा संपर्कप्रमुख आमदार प्रवीण दरेकर उपस्थित राहणार असल्याची माहिती त्यांनी दिली. (वार्ताहर)