नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका करंडक राज्यस्तरीय बालनाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीला सोमवारी वाशीतील विष्णूदास भावे नाट्यगृहात सुरुवात झाली. अंतिम फेरीसाठी १५ नाटकांची निवड करण्यात आली असून विजेतेपदासाठी बालकलाकारांमध्ये चुरस निर्माण झाली आहे.
बाल कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेने राज्यस्तरीय बालनाट्य स्पर्धा आयोजित केली आहे. प्राथमिक फेरीसाठी ३५ नाटकांचा समावेश करण्यात आला होता. पुणे, नाशिक व नवी मुंबईमध्ये प्राथमीक फेरी घेण्यात आली. अंतीम फेरी १३ व १४ मार्चला वाशीतील विष्णूदास भावे नाट्यगृहात होत आहे. अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या ऐरोली शाखेने सादर केलेल्या व्हॉट्सअपचा तमाशा या बालनाट्याने अंतीम फेरीला सुरुवात झाली. स्पर्धेमध्ये नवी मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी, नाशिक, पुणे, कोल्हापूर, जळगाव, अमरावती परिसरातून स्पर्धक सहभागी झाले आहेत.
महाअंतिम फेरीचा शुभारंभ अभिनेत्री अदिती सारंगधर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी मनपाचे उपायुक्त सोमनाथ पोटरे, सचिव चित्रा बाविस्कर उपस्थित होत्या. परिक्षक म्हणून अदिती सारंगधर, आल्हाद काळे, श्वेता पेंडसे, रेवप्पा गुरव उपस्थित होते. मंगळवारी सायंकाळी ६ वाजता बक्षीस वितरण सोहळा होणार आहे.