नवी मुंबई : छताच्या पत्र्यावर अडकलेले बॅडमिंटनचे कॉक काढण्याच्या प्रयत्नात १३ वर्षीय मुलाच्या मृत्यूची घटना घडली आहे. तो पत्र्यावर चढला असता, तिथल्या उघड्यावरील वायरचा त्याला शॉक लागल्याचा आरोप नातेवाइकांसह परिसरातील नागरिकांकडून केला जात आहे.मिलिंद यादव (१३) असे दुर्घटनेत मृत पावलेल्या मुलाचे नाव आहे. मंगळवारी सकाळी तो राहत्या परिसरात मित्रांसोबत बॅडमिंटन खेळत होता. या वेळी कॉक घराच्या पत्र्यावर गेल्याने तो काढण्यासाठी मिलिंद पत्र्यावर चढला होता. त्याच वेळी अचानकपणे तो खाली कोसळला असता, उपचारासाठी रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. त्याला घरांच्या छतावर उघड्यावर लटकणाऱ्या विद्युत वायरचा शॉक लागल्याचा आरोप मयत मिलिंदच्या नातेवाइकांसह परिसरातील नागरिकांनी केला आहे; परंतु शवविच्छेदनाच्या अहवालातून मूळ प्रकार स्पष्ट होणार असल्याचे महावितरणच्या जनसंपर्क अधिकारी ममता पांडे यांनी सांगितले.मात्र, या दुर्घटनेला महावितरणचा ढिसाळ कारभार जबाबदार असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते अशोक विघ्ने यांनी केला आहे. जागोजागी उघड्यावर महावितरणच्या वायर लटकत असून, त्यामुळे मृत्यूचे सापळे तयार झाले आहेत. अनेक ठिकाणी वायरींना देण्यात आलेले जोडही उघड्यावर ठेवण्यात आले आहेत. अशाच वायरीला स्पर्श झाल्याने मिलिंद हा छतावरून पडून मृत पावल्याचाही आरोप त्यांनी केला आहे.
पावणे गावात छतावरून पडून मुलाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2019 2:24 AM