नवी मुंबई : महानगरपालिका रुग्णालय व्यवस्थापनाच्या निष्काळजीपणामुळे १३ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
तुर्भे येथील इंदिरानगर झोपडपट्टीमध्ये राहणाºया १३ वर्षांच्या मुलाची प्रकृती बिघडल्याने त्याला ६ ऑगस्टला उपचारासाठी मनपा रुग्णालयात नेण्यात आले. त्याची अँटिजेन चाचणी निगेटिव्ह आल्यामुळे त्याला इतर रुग्णालयात घेऊन जाण्यास सांगितले. मुलाची आॅक्सिजन पातळी ६0 वर असल्याने रुग्णालयाने आरटीपीसीआर चाचणी व छातीचा एक्सरे काढणे आवश्यक होते; परंतु तसे न करता इतर ठिकाणी हलविण्यास सांगितले. खासगी रुग्णालयात घेऊन जाण्याची आर्थिक स्थिती नसल्याने पालकांनी मुलाला घरी नेले; परंतु त्याची प्रकृती बिघडल्याने त्याला नागरी आरोग्य केंद्रातील डॉक्टरांनी पुन्हा मनपा रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचारादरम्यान मुलाचा मृत्यू झाला. रुग्णालय व्यवस्थापनाच्या निष्काळजीपणामुळे हा प्रकार घडला असून, मनपा आयुक्त अभिजित बांगर यांनीही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणी निष्काळजीपणा करणाऱ्यांवर कारवाईची मागणी होत आहे.