चुकीच्या इंजेक्शनमुळे चिमुकल्याचा मृत्यू? कामोठेतील घटना; पोलीस ठाण्यात तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2022 05:49 AM2022-05-10T05:49:47+5:302022-05-10T17:24:43+5:30
आदई येथील चार वर्षीय अर्जुन नेपाळी याच्या पाठीवर गाठ आली होती. यासाठी त्याला एमजीएम रुग्णालयात उपचारासाठी आणले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवीन पनवेल : कामोठे एमजीएम रुग्णालयात एका चार वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हॉस्पिटलमधील टेक्निशियनने या मुलाला इंजेक्शन दिल्यानेच मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप करून पालकांनी कामोठे पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.
याप्रकरणी मृत मुलाचा शवविच्छेदन अहवाल आणि डॉक्टरांच्या समितीचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल, असे खांदेश्वर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष कोकाटे यांनी सांगितले. आदई येथील चार वर्षीय अर्जुन नेपाळी याच्या पाठीवर गाठ आली होती. यासाठी त्याला एमजीएम रुग्णालयात उपचारासाठी आणले होते. एमजीएम रुग्णालयातील टेक्निशियनने दिलेल्या चुकीचे इंजेक्शनमुळेच त्या मुलाचा जागीच मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीय आणि मनसे कार्यकर्त्यांकडून केला जात आहे.
या चार वर्षीय मुलाच्या मृत्यूनंतर टेक्निशियन फरार असल्याचे समोर आले आहे. याबाबत मृत मुलाच्या कुटुंबीयांनी मनसेचे पनवेल शहराध्यक्ष योगेश चिले यांच्याकडे तक्रार केली. त्यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन प्रशासनाला जाब विचारला व पोलीस स्टेशन गाठले. यावेळी प्रशासन आणि चुकीचे इंजेक्शन देणाऱ्यावर कडक कारवाईची मागणी योगेश चिले, पराग बालड यांनी केली आहे. याबाबत एमजीएम रुग्णालयाच्या प्रशासनाशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.