बालकामगारांची शहरातून सुटका
By admin | Published: January 30, 2016 02:32 AM2016-01-30T02:32:49+5:302016-01-30T02:32:49+5:30
गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने १० बालकामगार मुलांची सुटका केली आहे. कोपरखैरणे व वाशी परिसरात विविध हॉटेल व दुकानांमध्ये छापे टाकून पोलिसांनी या कारवाया
नवी मुंबई : गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने १० बालकामगार मुलांची सुटका केली आहे. कोपरखैरणे व वाशी परिसरात विविध हॉटेल व दुकानांमध्ये छापे टाकून पोलिसांनी या कारवाया केल्या आहेत. ही सर्व मुले परराज्यातील असून १३ वर्षांखालील आहेत.
बालमजुरीला बंदी असतानाही अनेक ठिकाणी नियम धुडकावून अल्पवयीन मुलांना कामावर ठेवल्याचे पहायला मिळते. शहरातील अनेक हॉटेल, चायनीज सेंटर, चहाच्या टपऱ्या, कॅटरर्स याठिकाणी ही अल्पवयीन मुले काम करत असतात. ही मुले घरातून पळून आल्याची देखील शक्यता असते. त्यानुसार अशा ठिकाणांचा शोध घेवून बालकामगारांची सुटका करण्याची मोहीम गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत दोन दिवसात १० बालकामगारांची सुटका त्यांनी केली आहे. त्यासाठी गुन्हे शाखा उपआयुक्त दिलीप सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पुष्पलता दिघे, सहाय्यक निरीक्षक संजय क्षीरसागर आदींचे पथक ठिकठिकाणी छापे टाकत आहे. गुरुवारी त्यांनी कोपरखैरणे परिसरातील हॉटेल, कॅटरर्स, नर्सरी अशा ठिकाणांची झाडाझडती घेतली. त्यामध्ये ६ बालकामगार आढळून आले. चौधरी भोजनालय, रसोई भोजनालय, हनुमान नर्सरी, रफिक कॅटरर्स याठिकाणी ही मुले काम करत होती. ते मूळचे बिहार, राजस्थान व उत्तर प्रदेशचे राहणारे आहेत. त्यांना सी.डब्ल्यू.सी. समोर हजर करुन बालआश्रमात ठेवण्यात आले आहे. तिथून त्यांच्या मूळ गावी पाठवले जाणार आहे.
या मुलांपैकी काही जण घर सोडून पळालेले होती तर काही हरवलेले होते. याच पथकाने शुक्रवारी वाशी रेल्वे स्थानक, सेक्टर ९, १७ परिसरात झाडाझडती घेतली. त्यामध्ये ५ बालकामगार पोलिसांना आढळून आले आहेत. तर उर्वरित मुलांच्या वयाची खात्री करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरु होते. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने सहाय्यक कामगार आयुक्तालयाच्या अधिकाऱ्यांसमक्ष ही मोहीम राबवली. त्यानुसार कोपरखैरणे व वाशी पोलीस ठाण्यात संबंधितांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. (प्रतिनिधी)