पालघर जिल्ह्यात बालमृत्यूचे थैमान
By Admin | Published: September 17, 2016 01:50 AM2016-09-17T01:50:29+5:302016-09-17T02:09:11+5:30
नवनिर्मित पालघर जिल्ह्यामध्ये अक्षरश: बालमृत्यूचे थैमान सुरू आहे. १९९१-९२ च्या वावर-वांगणीतील बालमृत्युकांडापेक्षाही भयाण परिस्थिती निर्माण झाली आहे.
पालघर/विक्रमगड : नवनिर्मित पालघर जिल्ह्यामध्ये अक्षरश: बालमृत्यूचे थैमान सुरू आहे. १९९१-९२ च्या वावर-वांगणीतील बालमृत्युकांडापेक्षाही भयाण परिस्थिती निर्माण झाली आहे. अवघ्या एका वर्षाच्या कालावधीत ६०० बालकांचा मृत्यू झाला आहे आणि तेवढीच बालके मृत्यूच्या वाटेवर आहेत. पालघर जिल्ह्यातील मोखाडा, जव्हार, वाडा या भागांतील कुपोषित मुलांच्या समस्या सोडवण्यासाठी आरोग्य, महिला व बालकल्याण आणि आदिवासी विभागासोबत समन्वय साधून युद्धपातळीवर प्रयत्न करा, असे निर्देश राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी बुधवारी राजभवनामध्ये झालेल्या बैठकीत दिले.
या तालुक्यात कुपोषणग्रस्त बालकांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. मागील महिन्यात मोखाडा तालुक्यात १३ व वाड्यातील १ अशा १४ कुपोषणग्रस्त बालकांचा योग्य उपचाराअभावी मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर कुपोषणग्रस्त मुलांच्या संख्येचा आढावा घेण्यासाठी राजभवन येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला महिला व बालविकासमंत्री पंकजा मुंडे, आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा, आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या वेळी या जिल्ह्यामध्ये कुपोषणाची गंभीर समस्या असणे चिंंताजनक आहे. कुपोषणावर दीर्घकालीन उपाययोजनांबरोबरच तातडीच्या उपाययोजना हाती घ्याव्यात, तसेच येत्या या महिनाभरात या भागातील कुपोषणाच्या समस्येवर नियंत्रण मिळवावे. कुपोषणमुक्तीसाठी सर्व विभागांनी समन्वयातून काम करण्याचे निर्देश राज्यपाल यांनी या वेळी दिले.
आदिवासी भागातील जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, आरोग्य अधिकारी यांची २० सप्टेंंबर रोजी बैठक घेऊन कृती आराखडा तयार करण्यात यावा. आरोग्य केंद्रामधील रिक्त पदांवर नेमणूक झालेल्या डॉक्टरांनी हजर होण्यासाठी प्रभावी उपाय योजावेत असे निर्देश राज्यपालांनी या वेळी दिले. (प्रतिनिधी)
कुपोषणामुळे मोखड्यातील कळमवाडी येथील सागर वाघ या बालकाच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबाच्या भेटीला जाणाऱ्या जिल्ह्याचे पालकमंत्री व आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांच्याशी गैरवर्तणूक केल्याबद्दल श्रमजीवीच्या १५ ते २० कार्यकर्त्यांवर याप्रकरणी मोखाडा पोलीस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल झाला आहे. कळमवाडी येथील कुपोषनाने मृत्यू झालेल्या बालकाच्या कुटुंबाची भेट घेण्यासाठी जात असताना श्रमजीवीच्या काही कार्यकर्त्यांनी मंत्रांना घेराव घालून ‘तुम चाले जावं’ अशा घोषणा देत धक्काबुक्की केली. तसेच वाघ कुटंबियांच्या घरात जाण्यासाठी मज्जाव करून शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उप निरीक्षक आय.आय.नदाफ हे करीत आहेत.
राज्यपालांनी ह्या संदर्भात गंभीर दखल : राज्यपालांनी ह्या संदर्भात गंभीर
दखल घेत ग्रामविकास, महिला,बालविकास मंत्री,पंकजा मुंडे,आरोग्य मंत्री दीपक सावंत,आदिवासी मंत्री विष्णू सावरा याना फटकारीत स्वत: घटनास्थळी जाऊन ठोस उपाय योजना आखण्याचे निर्देश दिले आहेत. त्या प्रमाणे २१ सप्टेंबर रोजी तिघेही मोखाड्यात जाणार आहेत. त्या नंतर शुक्रवारी काँग्रेसचे खासदार हुसेन दलवाई, राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या चित्रा वाघ यांनी मोखाड्याला भेटी दिल्या. तर विधान सभेचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते ही जव्हार,मोखाड्याला भेटी देणार आहेत.
२ किलो २०० ग्रॅम वजनाची मुलगी कुटीरमध्ये दाखल
जव्हार-मोखाडा पाठोपाठ आता पालघर तालुक्यातही कुपोषित बाळ आढळू लागले असून ७ महिन्याच्या २ कीलो २०० ग्रॅम वजनाच्या मुलीला वैद्यकीय अधिकारी व शिवसेना कार्यकर्ते देसाई यांच्या सहकार्याने डहाणूतील कुटीर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र रुग्णांच्या सेवेसाठी ठेवलेल्या
१०८ क्रमांकाची रुग्णवाहिकेचा फोन
बंद असल्याने त्यांची कुचंबना झाली.
पालघर जंगलपट्टी भागात येणारे प्राथमिक केंद्र दुर्वेस अंतर्गत टेन येथील सुरकी सुदाम कातकरी ७ महिन्याची २ कि. २०० ग्रॅम वजनाची असलेली कुपोषित मुलीला प्राथमिक आरोग्य केंद्र दुर्वेस येथे उपचारासाठी आणली असता तिची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
येथे पुरेशा सुविधा नसल्याने डॉ. संजय बुरपल्ले यांनी तीला तपासून डहाणू येथील कुटीर रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले.
सोबत असलेले दिलीप देसाई यांनी १०८ वर कॉल केला. तर हा दूरध्वनी क्रमांक बंद दाखविण्यात आला. त्यानंतर बुरपल्ले यांनी १०८ व्यवस्थापक पाटोटे यांना फोन करून रूग्णवाहिका मागवून त्यांना डहाणू येथे हलविले.