नवी मुंबई : वडिलांच्या निधनाने एकाकी पडलेल्या चार वर्षांच्या मुलाला छत्र मिळवून देण्याचे कार्य सामाजिक संस्था व सानपाडा पोलिसांनी केले आहे. सानपाडा सेक्टर ८ येथील झोपडीत बुधवारी रात्री हा प्रकार घडला आहे. त्याठिकाणी चिमुकला एकटा आढळून आल्याने त्याला आश्रयासाठी बाल आश्रमात ठेवण्यात आले.
सानपाडा सेक्टर ८ येथील झोपडपट्टी भागात हा प्रकार घडला आहे. ओम साई राम सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून त्याठिकाणच्या लहान मुलांना मोफत शिक्षण दिले जाते. तर लॉकडाऊनच्या कालावधीत या संस्थेकडून त्याठिकाणी अन्नदेखील वाटप केले जात आहे. त्यानुसार बुधवारी रात्री संस्थेच्या नीता खोत या सहकाऱ्यांसह त्याठिकाणी अन्न वाटपाला गेल्या होत्या. यावेळी तिथे एकटा असलेल्या चार वर्षांच्या मुलाकडे त्यांनी वडिलांची चौकशी केली.
यावेळी वडील झोपडीत असल्याचे त्याने सांगितले. यामुळे खोत यांनी त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला असता, त्यांचे निधन झाले असल्याचे उघड झाले. याबाबत त्यांनी सानपाडा पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी राजा चव्हाण यांचा मृतदेह ताब्यात घेऊन वैद्यकीय तपासणी केली. यावेळी त्यांचा आकस्मिक मृत्यू झाला असून, कोरोनाची चाचणीदेखील निगेटिव्ह आली. या चार वर्षांच्या मुलावरील कुटुंबाचे छत्र हरपल्याने तो पोरका झाला होता. यावेळी ओम साई राम संस्था व सानपाडा पोलीस यांनी परिसरातील ‘जीवन ज्योती आशालय’ या आश्रमात त्याची निवाऱ्याची सोय केली आहे.