लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : पालिका रुग्णालयामधील एनआयसीयू युनिट बंद असल्याने तळवलीमधील नवजात जुळ्या मुलांचा मृत्यू झाला आहे. पालिका प्रशासन नागरिकांच्या आरोग्याशी खेळत आहे. अर्थसंकल्पात आरोग्यासाठी करोडो रुपयांची तरतूद असतानाही योग्य कामांवर खर्च केला जात नसून, निष्काळजीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी नगरसेवकांनी स्थायी समितीमध्ये केली आहे. नवी मुंबई महानगरपालिका आरोग्य विभागावर प्रत्येक वर्षी करोडो रुपये खर्च करत आहे; परंतु शहरवासीयांना चांगली आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात प्रशासनाला अद्याप यश आलेले नाही. पालिका रुग्णालयात योग्य उपचार मिळत नसल्याने नाईलाजाने नागरिकांना खासगी रुग्णालयांमध्ये जावे लागत आहे. ढासळलेल्या आरोग्य व्यवस्थेचे तीव्र पडसाद बुधवारी स्थायी समितीच्या सभागृहामध्ये उमटले. तळवलीमधील एका महिलेला जुळी मुले झाली. मुलांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना एनआयसीयू युनिटमध्ये हलविणे आवश्यक होते; पण पालिकेच्या रुग्णालयातील युनिट बंद असल्याने नाईलाजाने मुलांना पीकेसी रुग्णालयात भरती करावे लागले. चार दिवसांनी मुलांचा मृत्यू झाला. सर्वसाधारणसभा व स्थायी समितीने आरोग्य विभागासाठीच्या खर्चामध्ये कधीच हात आखडता घेतलेला नाही. यानंतरही एनआयसीयू युनिट सक्षम का करण्यात येत नाही? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. नामदेव भगत यांनीही आरोग्य विभागाच्या कामकाजावर आक्षेप घेतले. चौथ्या मजल्यावर डॉक्टरांमध्ये प्रचंड राजकारण सुरू आहे. एकमेकांविरोधात कटकारस्थान करण्यामध्ये अधिकारी व्यस्त असून, दुसरीकडे नागरिकांच्या आरोग्याची हेळसांड होत असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. गटबाजी सोडून नागरिकांना चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक देवीदास हांडे-पाटील यांनीही प्रशासन जनतेच्या आरोग्याशी खेळत असल्याची टीका केली. आरोग्य समितीचे सभापती असताना, एनआयसीयू युनिटसाठी तातडीने उपकरणे खरेदी करण्याची मागणी केली होती. यापूर्वी आयुक्त दिनेश वाघमारे यांनीही तातडीने एनआयसीयू युनिटसाठी उपकरणे खरेदी करण्यासाठीचे आदेश दिले होते; परंतु प्रशासनाने ते खरेदी केले नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. खासगी रुग्णालयांना लाभ पोहोचविण्यासाठी पालिका प्रशासन झटत असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. आरोग्य विभागात जोरदार राजकारण सुरू आहे. नवी मुंबईकरांच्या आरोग्याशी खेळणे थांबविले पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. अशोक गुरखे यांनीही चांगल्या आरोग्य सुविधा मिळाव्या, अशी अपेक्षा व्यक्त केली.
निष्काळजीपणामुळे जुळ्या मुलांचा मृत्यू
By admin | Published: June 29, 2017 3:05 AM