नवी मुंबई : दिवाळीच्या सुट्टीत मुलांच्या रिकाम्या हातांना किल्ले घडवण्याचे ध्येय मिळू लागले आहे. मागील काही दिवसांपासून शहराच्या विविध भागांमध्ये असे किल्ले रचले जात असल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळे बाल मावळ्यांच्या विरंगुळ्यासह त्यांच्या ऐतिहासिक ज्ञानात भर पडत आहे.
दिवाळीच्या सुट्टीत किल्ले बनवण्याची परंपरा अनेक वर्षांपासून चालत आली आहे. आजही लहान मुलांमध्ये त्यास पसंती मिळताना दिसत आहे. दिवाळीची सुट्टी लागली की मोकळ्या जागेत मातीचे ढिगारे रचून वेगवेगळ्या किल्ल्यांची प्रतिकृती साकारली जाते. त्यानुसार नवी मुंबईतदेखील शाळकरी मुलांसह तरुणांमध्ये किल्ले बनवण्याचे आकर्षण दिसून येत आहे. इतरांपेक्षा आपला किल्ला सरस झाला पाहिजे याकरिता त्यांच्यात आपसात स्पर्धा लागत आहेत. यातून मुलांच्या ज्ञानात भर पडत आहे, शिवाय त्यांचा रिकाम्या वेळेचा सदुपयोगदेखील होत आहे.
सीबीडी सेक्टर २ येथे साई एकता मित्र मंडळाच्या वतीने राजगडाची प्रतिकृती साकारली जात आहे. रोहन गुरव, रोहित गुरव, ऋषभ चंदानी, भौम अनभवणे, सिद्धेश दरेकर, अवनीश धुमाळ, वेदांत घोरपडे व मंथन चंदानी आदी मुले त्यासाठी परिश्रम घेत आहेत. भव्य स्वरूपात किल्ला साकारून परिसरातील चिमुकल्यांना त्या ठिकाणी खिळवून ठेवण्याचे काम या माध्यमातून होत आहे.