मुले पाळणाघरात, आई मतदानकेंद्रात; औषधांच्या पेटीची सोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 01:37 AM2019-04-22T01:37:18+5:302019-04-22T01:38:38+5:30
मतदान टाळण्याकरिता आता सबब नाही
- सुरेश लोखंडे
ठाणे : घरी मुले सांभाळायची होती, त्यांना पाहायला कुणी नव्हते म्हणून मतदान केले नाही, असे सांगण्याची सोय यावेळी मातांना नाही. मतदान केंद्रांवर पाळणाघराची सोय केली आहे. उन्हामुळे डोकेदुखी होईल किंवा चक्कर येईल म्हणून मतदान टाळले, असे सांगायचीही संधी नाही. प्रत्येक मतदान केंद्रावर चक्कर, डोकेदुखी किंवा किरकोळ जखमेवरील प्रथमोपचाराची औषधाची पेटी (मेडिकल किट्स) उपलब्ध असणार आहेत. त्यामुळे आता मतदान टाळण्याकरिता कुठलीही सबब असणार नाही. जिल्ह्णातील ठाणे, कल्याण, भिवंडी या तिन्ही मतदारसंघांसाठी २९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे.
या तिन्ही मतदारसंघांमध्ये सुमारे ६२ लाख २५ हजार मतदार आहेत. त्यांच्या मतदानासाठी सहा हजार ७१५ मतदानकेंद्रे निश्चित केली आहेत. घरी लहान मुले असलेल्या महिला बरेचदा आपण मतदानाला गेलो आणि लांबचलांब रांग असेल तर मुलांना कोण सांभाळणार, असा विचार करुन मतदान टाळतात. समजा मुले सोबत घेऊन गेल्या आणि मुलानं रडून गोंधळ घातला किंवा मतदान यंत्राच्या ठिकाणी नेल्यावर यंत्राला हात लावला तर पंचाईत व्हायची, म्हणूनही काहीवेळा माताभगिनी मतदान टाळतात. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या ही बाब लक्षात आल्याने त्यांनी यावेळी प्रत्येक मतदानकेंद्रावर पाळणाघराची सोय केली आहे. मतदानाला येणाऱ्या मातांनी तेथील खेळण्यांसोबत आपल्या मुलांना सोडून मतदानाचे पवित्र कर्तव्य बजावावे, अशी अपेक्षा आहे. मुलांचा सांभाळ करण्याकरिता या पाळणाघरात स्वयंसेविका, अंगणवाडीसेविका उपलब्ध आहेत. तसेच मेडिकल किट्स उपलब्ध असल्याचे ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी सांगितले. जास्तीतजास्त महिलांनी बालकांसह मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहनही त्यांनी केले.
जिल्ह्णातील सर्व मतदान केंद्रांवर पाळणाघरांचे नियोजन केले आहे का व त्यांची नेमकी संख्या किती, असे जिल्हा परिषदेचे महिला, बालकल्याण अधिकारी संतोष भोसले यांना विचारले असता त्यांनी मतदारसंघांच्या सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे अंगलीनिर्देश करून माहिती देण्यास टाळले. वारंवार याबाबत विचारल्यावर आम्हाला तशी माहिती देता येणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे प्रत्येक मतदानकेंद्रांवर पाळणाघर असेल की, काही ठराविक मतदान केंद्रांवर प्रातिनिधीक स्वरुपात ही सोय केली जाईल ते स्पष्ट झाले नाही. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनीष रेघे यांनी मेडिकल किट्ससंदर्भात माहिती दिली. या औषध पेटीत पेनकिलर, पॅरासिटीमॉलच्या गोळ््या, जखमेवर लावायची आयोडीन, बेन्झॉइन ही औषधे असतील. ही औषधे कशी व कशासाठी वापरावी, याची माहिती पुस्तिका ठेवण्यात येणार आहे. ते वाचून या औषधांचा वापर बुुथवरील कर्मचारी किंवा स्वत: मतदारालाही करता येणार आहे. अन्यथा, जवळच्या रुग्णालयात जाऊन उपचारही करता येणार असल्याचे डॉ. रेघे यांनी सांगितले.
असा घेता येईल औषधांचा डोस
या मेडिकल किट्समध्ये (बॉक्स) सहा प्रकारच्या औषधी गोळ्या व साहित्य भरण्याचे काम सुरू आहे. यामध्ये ओआरएसचे पाकीट असणार आहे. ते लिक्विडच्या स्वरूपात आहे. त्याचा वापर चक्कर येणे, दम लागणे, शरीरातील पाणी कमी होणे, उन्हाळा लागल्यास वापर करता येईल.
याप्रमाणेच ‘रेंटेक’ नावाची गोळी आहे. तिचा वापर अॅसिडिटीसाठी करता येईल. पॅरासिटॉमल ही गोळी डोकेदुखी, अंगदुखी, तापासाठी वापरता येईल. अॅण्टिसेफ्टिक लिक्विड ही जखम झाल्यावर लावता येईल. जखमेचे रक्त साफ करण्यासाठी कापूस वापरावा लागेल आणि बॉक्समध्ये असलेल्या बॅण्डेजचा वापर त्वचेवर खरचटल्यावर करता येणार असल्याची माहिती डॉ. रेघे यांनी लोकमतला दिली.