- सूर्यकांत वाघमारे नवी मुंबई : विशेष मुलांच्याही विरंगुळ्यासाठी पालिकेने सानपाडा येथे संवेदना उद्यान विकसित केले आहे. या उद्यानात विकलांगांसह विशेष मुलांनाही वेगवेगळे अनुभव घेता येतील, अशा सोयी पुरवण्यात आल्या आहेत. त्याकरिता सुमारे पावणेसात कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे.शहराच्या सौंदर्यीकरणासाठी तसेच नागरिकांच्या विरंगुळ्यासाठी नवी मुंबई महापालिकेने शहरात तब्बल १६३ उद्याने विकसित केली आहेत. यामुळे उद्यानांचे शहर अशीही नवी मुंबईची ओळख होत आहे. अशातच वैशिष्ट्यपूर्ण उद्याने विकसित करण्यावरही पालिकेकडून भर दिला जात आहे. त्यानुसार सानपाडा सेक्टर-१० येथे पालिकेने सुमारे पावणेसात कोटी रुपये खर्चून संवेदना उद्यान विकसित केले आहे. राज्यात प्रथमच अशा प्रकारचे उद्यान तयार झाले असून, त्यामध्ये विकलांगांसह विशेष मुलांच्या विरंगुळ्याची पुरेपूर काळजी घेण्यात आलेली आहे. यावरून सर्वसामान्यांप्रमाणेच शारीरिक अपंगत्व असलेल्यांसह दृष्टिहीन अथवा विशेष मुलांच्या बाबतीतही प्रशासन संवेदनशील असल्याचे दिसून येत आहे. तर उद्यानातील ज्येष्ठ नागरिकांना चालताना त्रास होऊ नये, यासाठी सिन्थॅटिक जॉगिंग ट्रॅक तयार करण्यात आला आहे. अशा प्रकारचा जॉगिंग ट्रॅक शहरात प्रथमच तयार करण्यात आला आहे. तर दिव्यांग व्यक्तीला उद्यानाच्या बाहेरपासून ते आतमध्ये खेळण्यांपर्यंत मनसोक्त वावरता यावे, याकरिता एम्बोस्ड डिझाइनचा ट्रॅक करण्यात आला आहे. तर अपंग मुलांना झोक्याचा आनंद घेता यावा, याकरिता व्हीलचेअरसह बसता येईल, अशा झोक्याची सोय करून देण्यात आली आहे. विशेष मुलांना स्पर्शातून वेगवेगळ्या गोष्टी अनुभवता याव्यात, याकरिता संवेदना पथ तयार करण्यात आला आहे. त्याशिवाय ब्रेल लिपीतून उद्यानाच्या माहितीसह मुळाक्षरे व अंकांचीही माहिती त्यांना घेता येईल, अशी सोय या उद्यानात करण्यात आली आहे.पालिकेने विशेष मुलांची विशेष काळजी घेत हे उद्यान बनवले आहे. त्यानुसार ज्ञानेंद्रियांच्या एकीकरणासाठी विकसित करण्यात आलेली जागा म्हणूनही हे उद्यान परिचित होणार आहे. त्याकरिता स्वयंसंवेदन (शरीरस्थिती) शरीराचा तोल सांभाळणे, स्पर्शज्ञान, श्रवणज्ञान, दृष्टिज्ञान, गंधज्ञान तसेच चवीचे ज्ञान आदीवर विशेष प्रकाश टाकण्यात आला आहे. यामुळे विकलांगांसह विशेष मुलांसाठीचे हे उद्यान संपूर्ण शहरवासीयांचे आकर्षण ठरणार आहे. तर सर्वसामान्यांनाही आकर्षित करेल असा हिरवा गालिचा व विद्युत रोषणाई उद्यानात करण्यात आली आहे.
विशेष मुलांसाठी पालिकेचे संवेदना उद्यान; राज्यातील पहिला उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2019 1:44 AM