लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : उन्हाचा तडाखा वाढू लागल्यापासून गृहिणींची वर्षभर लागणारी चटणी व इतर वस्तू बनविण्यासाठीची लगबग सुरू झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी मिरचीचे दर जवळपास निम्यावर आल्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला असून, तिखट मिरची गोड झाल्याची भावना गृहिणींमधून व्यक्त होत आहे.
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये प्रतिदिन ५० ते ६० टन मिरचीची आवक होत आहे. गुजरात, मध्य प्रदेश व महाराष्ट्रातील हंगाम जवळपास संपला असून, आता आंध्र प्रदेश, कर्नाटक व तेलंगणामधून मिरची विक्रीसाठी येत आहे. गतवर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी मिरचीचे दर कमी असल्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळू लागला आहे. गतवर्षी बेडगी मिरचीचे दर प्रतिकिलो ५०० ते ७०० रुपये होते. यावर्षी हेच दर २५० ते २५० रुपयांवर आले आहेत. तेजाचे दर २०० ते ३०० वरून २२० ते २३० रुपये किलो झाले आहेत. काश्मीरी मिरचीचे दर ६५० ते ८०० रुपये किलोवरून ३५० ते ५०० रुपये किलोवर आले आहेत. दर कमी झाल्यामुळे गृहिणींचीही वर्षभराची चटणी तयार करण्यासाठी लगबग सुरू असून, प्रत्येक डंकावर मिरची कुटून घेण्यासाठी गर्दी झालेली दिसत आहे.
बाजार समितीमध्ये मिरचीचा हंगाम जवळपास संपत आला असला तरी मे महिन्यापर्यंत ग्राहकांकडून मागणी राहणार असून, यावर्षी दर कमीच राहतील, असे मत व्यापाऱ्यांनी व्यक्त केले.
गतवर्षी उत्पादन कमी असल्यामुळे बाजारभाव वाढले होते. यावर्षी मिरचीचे दर कमी असून, ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. सद्य:स्थितीमध्ये दक्षिणेकडून राज्यांमधून मोठ्या प्रमाणात आवक होत आहे.-अमरीश बरोत, व्यापारी प्रतिनिधी, मसाला मार्केटधने, हळद, तेज पत्त्याची तेजी सुरूचमिरचीचे दर कमी झाले असले तरी इतर मसाल्यांच्या दरामध्ये मात्र वाढ झाली आहे. जानेवारीमध्ये हळदीचे दर प्रतिकिलो १४० ते २१० रुपये होते. आता हळद होलसेल मार्केटमध्ये १६० ते २२० रुपये किलो दराने विकली जात आहे. धने ६० ते १४० वरून ९० ते १७० रुपये, दगडफूल २८० ते ४०० वरून ३०० ते ४५० रुपये, काळी मिरी ६०० ते ८५० वरून ६५० ते ९५० रुपये व तेज पत्ता ३९ ते ५५ वरून ४५ ते ९० रुपये किलोवर पाेहोचले आहेत.