मिरचीचा ठसका, उत्पादन घटल्याने दरात वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2018 12:54 AM2018-03-28T00:54:02+5:302018-03-28T00:54:02+5:30
यंदा मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच उन्हाचा तडाखा वाढायला सुरुवात झाली आहे
प्राची सोनवणे
नवी मुंबई : यंदा मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच उन्हाचा तडाखा वाढायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे महिलांची वर्षभराचा मसाला बनवण्याची लगबग सुरू झाली आहे. उन्हाळा सुरू झाल्यापासून बाजारात मसाल्याची मिरची आणि अख्खा गरम मसाला घेण्यासाठी महिलांची गर्दी वाढू लागली आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी मसाल्याच्या मिरचीचे दर ३० ते ४० टक्क्यांनी वाढले आहेत. राज्यात आंध्रप्रदेश व कर्नाटक राज्यातील मिरचीची मोठ्या प्रमाणात आवक होत असून दरवर्षीपेक्षा मिरचीच्या भावात या वर्षी वाढ झाली आहे.
गतवर्षी आंध्रप्रदेशातील शेतकऱ्यांना मिरचीला योग्य भाव मिळत नसल्यामुळे उभे पीक जाळून देण्याची वेळ आली होती. त्यामुळे यावर्षी मिरचीच्या प्रमुख लागवड क्षेत्रात घट झाली आहे. परिणामस्वरूप उत्पादनात घट झाल्यामुळे यावर्षी मागणी जास्त व पुरवठा कमी, अशी स्थिती निर्माण झाल्यामुळे मिरचीच्या भावात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याची माहिती विक्रेते किशोर रविपती यांनी दिली. आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, गुजरात, महाराष्ट्र या प्रांतात मोठ्या प्रमाणात मिरचीची लागवड होते. आंध्रप्रदेशातील नैसर्गिक परिस्थितीमुळे मिरचीचे उत्पादन अधिक होते. गुंटूर परिसरात उत्पादित होणाºया मिरचीला गुंटूर मिरची तर खम्मम परिसरात उत्पादित होणाºया मिरचीस तेजा मिरची म्हणून ओळखले जाते. कर्नाटक प्रांतातील बेडगी परिसरात उत्पादित होणाºया मिरचीस बेडगी मिरची म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, उत्तर प्रदेश या राज्यातील लाल मिरची तिखट असते; पण रंग फिकट असतो. दीर्घ काळ ही मिरची टिकत नसल्यामुळे या मिरचीस मागणी कमी असते. काळा मसाला बनवण्यासाठी मिरची पावडर उत्पादक याचा वापर करतात तर या परिसरातील शेतकरी लाल मिरची न करता हिरवी मिरचीच दररोज विकून नगदी पैसा मिळवतात. देशभरात जानेवारी ते मे महिन्यापर्यंत घरगुती मिरचीची वार्षिक खरेदी केली जाते. याच काळातील लग्नसराईमुळेही मिरचीच्या मागणीत मोठी वाढ होते.
घरगुती मागणी प्रकारात बेडगी, गुंटूर व तेजा या जातीच्या मिरचीला मोठी मागणी आहे. जगभर झणझणीत व जास्त तिखट खाणारे लोक खम्ममची तेजा मिरची वापरतात तर रंगास गडद, चवदार, दीर्घकाळ रंग टिकणारी, कमी तिखट अशी बेडगी मिरची खाणारे उच्चशिक्षित लोक असतात. आंध्र प्रदेशात जानेवारी महिन्यापासूनच गुंटूर, वरंगल, खम्मम, हैदराबाद या बाजारपेठेत मिरचीची मोठी आवक असते.
ओखी वादळ तसेच अवकाळी पावसामुळे यंदा मिरचीच्या गुणवत्तेत आणि उत्पादनातही घट झाली असून परिणामी, आवक कमी झाल्याने दरांमध्ये वाढ झाली आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दिवसाला १२ गाड्या मिरचीची आवक केली जात आहे.
गेल्या वर्षी ६० ते ८० रुपये किलो दराने विकली जाणारी मिरची यंदा बाजारात ९० ते १२० रुपये किलो दराने विक्रीसाठी उपलब्ध असून दरात ३० टक्के वाढ झाल्याचे दिसून येते. मसाल्यासाठी कर्नाटकवरून येणारी बेडगी, काश्मिरी, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेशमधून येणारी गुंटूर आणि महाराष्ट्रातील तिखट तेजा मिरचीबरोबर आंध्रप्रदेशमधून येणाºया रेशमपट्टी मिरचीलाही मोठी मागणी आहे. महाराष्ट्रीयन जास्त प्रमाणात बेगडी, काश्मिरी आणि तेजा मिरचीचा वापर करतात. रेशमपट्टीला गुजरातीवर्गाकडून मोठी मागणी असते. ही मिरची कमी तिखट असते.