चिमुरडीला मंदिरात सोडून पलायन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2015 03:03 AM2015-08-18T03:03:01+5:302015-08-18T03:03:01+5:30

अज्ञात व्यक्तीने लहान मुलीला मंदिराच्या पायरीवर सोडून पळ काढल्याचा प्रकार वाशीत घडला आहे. याप्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Chimrudila leave the temple and flee | चिमुरडीला मंदिरात सोडून पलायन

चिमुरडीला मंदिरात सोडून पलायन

Next

नवी मुंबई : अज्ञात व्यक्तीने लहान मुलीला मंदिराच्या पायरीवर सोडून पळ काढल्याचा प्रकार वाशीत घडला आहे. याप्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस अज्ञात व्यक्तीचा शोध घेत आहेत. खासगी सोसायटीच्या आवारातील मंदिरात हा प्रकार सोमवारी दुपारी घडला.
वाशी सेक्टर ९ येथील कैलास अपार्टमेंट या खासगी सोसायटीमधील सिध्दिविनायक मंदिरात हा प्रकार घडला आहे. श्रावणातला पहिला सोमवार असल्याने मंदिरात भाविकांची गर्दी होती. या दरम्यान सोसायटीबाहेरच्या व्यक्तींना देखील प्रवेश खुला असल्याची संधी साधून अज्ञात व्यक्तीने हा प्रकार केला. देवदर्शनाच्या बहाण्याने तिथे आलेल्या एका व्यक्तीने मंदिराच्या पायरीवर पाच ते सात महिन्यांच्या मुलीला सोडून पळ काढला.
मंदिरातील गर्दी कमी झाल्यानंतर दुपारी १२.३०च्या सुमारास मंदिराचे पुजारी माधव लवाटे यांच्या निदर्शनास ही बाब आली. पायरीवर बसलेली एकटीच मुलगी रांगत मंदिराच्या आत आली. यावेळी लवाटे यांनी त्या मुलीच्या नातेवाइकांचा शोध घेण्यासाठी परिसरात विचारपूस केली. परंतु या मुलीला ओळखणारे कोणीच तिथे आढळले नाही. अखेर त्यांनी वाशी पोलिसांकडे ही मुलगी सोपवून तिला सोडून जाणाऱ्याविरोधात तक्रार केली.
अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून मुलीला नेरुळच्या विश्वबालक केंद्रात ठेवल्याचे वरिष्ठ निरीक्षक अजयकुमार लांडगे यांनी सांगितले. सोसायटी अथवा मंदिराच्या आवारात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले नव्हते. त्यानंतरही सुरक्षेत हलगर्जी करत सोसायटीच्या आत बाहेरच्या अनोळख्या व्यक्तींना प्रवेश देण्यात आला. याच संधीचा गैरफायदा घेत अज्ञात व्यक्तीने चिमुरडीला मंदिराच्या पायरीवर सोडून पळ काढला
आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Chimrudila leave the temple and flee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.