चिमुरडीने एकाच दिवशी सर केले पाच गड; उरणची हर्षिती भोईर अनोख्या विक्रमाच्या उंबरठ्यावर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2020 06:07 AM2020-01-28T06:07:08+5:302020-01-28T06:07:32+5:30

उरण तालुक्यातील भेंडखळ गावातील चिमुरडी हर्षिती भोईर हिला वयाच्या चौथ्या वर्षापासूनच ट्रेकिंगची आवड निर्माण झाली आहे.

Chimurdi heads five yards in one day; Uran's delight is at the threshold of an unprecedented record | चिमुरडीने एकाच दिवशी सर केले पाच गड; उरणची हर्षिती भोईर अनोख्या विक्रमाच्या उंबरठ्यावर

चिमुरडीने एकाच दिवशी सर केले पाच गड; उरणची हर्षिती भोईर अनोख्या विक्रमाच्या उंबरठ्यावर

Next

- मधुकर ठाकूर

उरण : उरण येथील साडेपाच वर्षांची चिमुरडी हर्षिती भोईर हिने लोणावळानजीक असलेले पाच किल्ले एका दिवसात तेही अवघ्या ११ तास ३९ मिनिटांत सर करून अनोखा विक्रम केला आहे. रविवारी, प्रजासत्ताक दिनी हर्षितीने केलेल्या धाडसी कामगिरीची उरण परिसरातच नव्हे राज्यभरातील ट्रेकर्स, क्रीडाप्रेमींकडून कौतुक होता आहे.
उरण तालुक्यातील भेंडखळ गावातील चिमुरडी हर्षिती भोईर हिला वयाच्या चौथ्या वर्षापासूनच ट्रेकिंगची आवड निर्माण झाली आहे. या आवडीतूनच तिने गड, किल्ले सर करण्याचा सपाटा लावला आहे. रविवारी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी तिने लोणावळानजीक असलेले श्रीवर्धन गड, मनोरंजन गड, लोहगड, विसापूर, तिकोना हे पाच गड एका दिवसात सर करण्याचा निर्धार केला होता. रविवारी सकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास आई -वडिलांसोबत श्रीवर्धन गडापासून सुरुवात करून सायंकाळपर्यंत पाचही गडांवर तिने मोठ्या शिताफीने चढाई केली. तेही अवघ्या २२ तास ३९ मिनिटांत.
याआधीही तिने ८ जून २०१९ रोजी महाराष्ट्रातील कळसूबाई हे सर्वात उंच शिखर वयाच्या अवघ्या साडेचार वर्षी फक्त ३ तास आणि ३५ मिनिटांत सर करून आपल्या नावाची नोंद इंडिया बुक आॅफ रेकॉर्ड आणि आशिया बुक आॅफ रेकॉर्डमध्ये केल्याची माहिती हर्षितीचे वडील कविराज भोईर यांनी दिली. तसेच तिने आत्तापर्यंत रायगड, कर्नाळा, श्रीवर्धन गड, प्रबळगड, कलावंतीण दुर्ग, शिवनेरी, लोहगड, विसापूर, तिकोना गड, तुंग (कठीण गड), मोरगिरी किल्ला, कोरी गड, आशेरी गड आदी १३ किल्ले सर केल्याची माहिती कविराज भोईर यांनी दिली.
अनुभवाच्या जोरावर प्रजासत्ताक दिनाच्या दिवशीच लोणावळानजीक असलेले श्रीवर्धन गड, मनोरंजन गड, लोहगड, विसापूर, तिकोना हे गड दिवसभरात सर करण्याचा निश्चय हर्षितीने केला होता. तिने अवघ्या ११ तास ३९ मिनिटांत हे किल्ले सर केले. हर्षितीच्या अनोख्या ट्रेकची नोंद वर्ल्ड बुक, आशिया बुक आणि इंडिया बुक आॅफ रेकॉर्डमध्ये करण्याचा प्रयत्न आहे. रविवारी हा ट्रेक यशस्वी झाल्याने हर्षितीची सर्वात लहान ट्रेकर अशीही नोंद होईल, असा विश्वासही कविराज यांनी व्यक्त केला.
उरणच्या साडेपाच वर्षीय हर्षिती भोईर या चिमुरडीने एकाच दिवशी पाच गडांवर यशस्वी चढाई करून भीम पराक्रम केला आहे. त्यामुळे उरणच्या नावलौकिकात भर पडली आहे. याबद्दल तिचे आणि तिला प्रोत्साहन देणाऱ्या आई-वडिलांवरही सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

- हर्षितीने ८ जून २०१९ रोजी महाराष्ट्रातील कळसूबाई हे सर्वात उंच शिखर वयाच्या अवघ्या साडेचार वर्षी फक्त ३ तास आणि ३५ मिनिटांत सर केले. याशिवाय तिने आतापर्यंत रायगड, कर्नाळा, श्रीवर्धन गड, प्रबळगड, कलावंतीण दुर्ग, शिवनेरी, लोहगड, विसापूर, तिकोना गड, तुंग (कठीण गड), मोरगिरी किल्ला, कोरी गड, आशेरी गड आदी १३ किल्ले सर केले आहेत.

Web Title: Chimurdi heads five yards in one day; Uran's delight is at the threshold of an unprecedented record

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Raigadरायगड