नवी मुंबई : शहरातील अनेक मोकळ्या जागा अनधिकृत चायनीज सेंटरने व्यापल्या आहेत. त्याठिकाणी उघड्यावर मद्यपानालाही मुभा दिली जात असल्याने रात्री उशिरापर्यंत तळीरामांच्या पार्ट्या रंगतात. यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवत असून अशा चायनीज सेंटरवर संबंधित प्रशासनाकडून कारवाईकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष होताना दिसत आहे.मागील काही महिन्यात शहरात अनधिकृत चायनीज सेंटरच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. विविध सुविधांसाठी राखीव असलेले मोकळे भूखंड, फॉरेस्ट लँड तसेच इतर आडोशाच्या जागी हे चायनीज सेंटर चालवले जात आहेत. सद्यस्थितीत शहरातील प्रत्येक नोडमध्ये असे चायनीज सेंटर पहायला मिळत आहेत. त्यापैकी कोपरखैरणे, घणसोली, दिवाळे, नेरुळ तसेच सारसोळे परिसरात सर्वाधिक चायनीज सेंटर चालत आहेत. त्याठिकाणी सर्रासपणे उघड्यावर मद्यपानाला मुभा दिली जात आहे. तर काही चायनीज सेंटरमध्ये ग्राहकांसाठी मद्यही उपलब्ध करून दिले जात आहे. यामुळे चायनीज सेंटरवर तळीरामांची गर्दी वाढत आहे. त्यांच्यासाठी रात्री उशिरापर्यंत हे चायनीज सेंटर सुरू ठेवले जातात. याठिकाणी उपलब्ध होणारे खाद्य नाल्यालगत अथवा, झाडीत शिजवले जाते. त्यामुळे आरोग्याचाही प्रश्न निर्माण होत आहे. यानंतरही पोलीस, उत्पादनशुल्क यासह संबंधित सर्वच प्रशासनांचे त्यावर कारवाईकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष होताना दिसत आहे.चायनीज सेंटरमध्ये रंगणाऱ्या मद्यपार्ट्यांमध्ये अनेकदा वादही निर्माण होतात. यासंदर्भात सर्वसामान्य नागरिकाने तक्रार केल्यास, तक्रारींना केराची टोपली मिळत आहे. परिणामी अप्रत्यक्षरीत्या प्रशासनाकडून मिळणाºया पाठबळामुळे, मागील काही महिन्यात शहरातील अनधिकृत चायनीज सेंटरच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. काहींनी केवळ गटारीच्या पूर्वसंध्येवरच चायनीज सुरू केल्याचीही चर्चा आहे. उघड्या जागेत शेड उभारून हे चायनीज चालवले जात आहेत. त्या ठिकाणी वापरले जाणारे गॅस सिलिंडर कुठून मिळवले जातात याचाही उलगडा होणे आवश्यक आहे. अन्यथा उघड्यावर सिलिंडरच्या होणाºया वापरामुळे आगीची घटना घडल्यास मोठ्या जीवितहानीची शक्यता वर्तवली जात आहे. यानंतरही चायनीज सेंटर चालकांना मिळणाºया मुभेमुळे प्रशासनाच्या भूमिकेविषयी सर्वसामान्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे.>चायनीज बनले मिनी बारबारमध्ये मद्यपान केल्याने होणाºया खर्चाला कात्री मारण्यासाठी चायनीज सेंटरवर मद्यपान करण्याला तळीरामांकडून पसंती मिळत आहे. त्याच संधीचा फायदा घेत सर्वच चायनीज चालकांकडून मद्यपानाला खुली मुभा दिली जात असल्याने चायनीज सेंटरला मिनी बारचेरूप आले आहे. मात्र त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात अवैधरीत्या मद्याचा वापर होत असतानाही उत्पादनशुल्क विभागाकडून कारवाईकडे दुर्लक्ष होत आहे.>हानिकारक खाद्यपदार्थाची विक्रीचायनीज सेंटरवर शिजवून विक्री केल्या जाणाºया खाद्यपदार्थ आकर्षक करण्यासाठी त्यात रंग वापरला जातो, तर भाजीपाला देखील हलक्या दर्जाचा वापरला जातो. मार्केटमधून निघणारा टाकाऊ माल चायनीज चालकांकडून खरेदी केला जातो. अनेकदा तो चायनीज सेंटरच्या जागेतच साठवला जातो. असे पदार्थ खाल्ल्यास नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहेत.>कोपरखैरणे, घणसोली परिसरात उघड्यावर चालणाºया चायनीज सेंटरमुळे सर्वसामान्यांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. चायनीजवर रात्री उशिरापर्यंत मद्यपान चालत असल्याने परिसराची शांतता भंग होत आहे. मात्र उघडपणे चालणाºया या चायनीज सेंटरवर कारवाई होत नसल्याने प्रशासनाच्या भूमिकेबाबत संशय व्यक्त होत आहे.- महेश जाधव, नागरिक, कोपरखैरणे
शहरात चायनीज सेंटरचे पेव
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2019 12:08 AM