नवी मुंबई : महापालिका व पोलिसांच्या दुर्लक्षामुळे शहरात अनधिकृत चायनीज सेंटरचे पेव सुटले आहे. त्याठिकाणी मद्यपानाला मुभा दिली जात असल्याने पहाटेपर्यंत दारूच्या पार्ट्या रंगत आहेत. यामुळे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या टोळ्यांचाही रात्रभर वावर होत आहे.
शहरात अनधिकृत चायनीज सेंटरचे प्रमाण पुन्हा एकदा वाढू लागले आहे. पहाटेपर्यंत चालणाऱ्या या चायनीज सेंटरच्या ठिकाणी सर्रास दारूच्या पार्ट्या रंगत आहेत. काही ठिकाणी चायनीज सेंटर चालकच दारू उपलब्ध करून देत आहेत. तर काही ठिकाणी सोबत आणलेली दारू पिण्याची मुभा दिली जात आहे. वाशी, घणसोली, सीबीडी बेलापूर आदी ठिकाणी मोकळ्या भूखंडावर चायनीज सेंटर चालवले जात आहेत. त्याठिकाणी ग्राहकांना मद्यपानास मुभा दिली जात असल्याने बार प्रमाणेच त्याठिकाणी तळीरामांची गर्दी जमत आहे. यावरून केवळ मद्यपानासाठी चायनीज सेंटर चालत असल्याचे स्पष्ट चित्र दिसून येत आहे. मात्र उघडपणे मद्यपान, मद्यविक्री चालत असतानाही उत्पादनशुल्क विभागाच्या नजरेस हे चित्र पडत नसल्याचे आश्चर्य व्यक्त होत आहे. तर मोकळे भूखंड अवैध व्यवसायासाठी हडपले जात असल्याने पालिका, सिडको यांचेही त्याकडे होणारे दुर्लक्ष अर्थपूर्ण संबंधाची शक्यता वर्तवली जात आहे. यातूनच स्थानिक पोलिसही त्याकडे कानाडोळा करत असल्याचा संताप नागरिक व्यक्त करत आहेत. घणसोली येथे पालिकेचे काही अधिकारीच दलालीच्या बैठकांसाठी चायनीज सेंटरचा आश्रय घेत असल्याची चर्चा आहे. तर सीबीडी बेलापूर येथे खाडीकिनारी चायनीज सेंटरच्या आडून जणू बारच चालवला जात असल्याची शंका व्यक्त होत आहे. परिणामी अशा ठिकाणी रात्री उशिरापर्यंत तळीरामांची ये जा सुरु राहत आहे. रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या चायनीज सेंटर, भुर्जी पावच्या गाड्या याठिकाणी हाणामारीच्या, गोळीबाराच्या घटना शहरात घडल्या आहेत. तर नेरूळच्या एका चायनीज सेंटरवर आश्रयासाठी आलेल्या अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न झाल्याचाही प्रकार घडला आहे. त्यानंतरही उघडपणे चायनीज सेंटर व तिथल्या मद्यपानाला मुभा मिळत असल्याचा संताप नागरिक व्यक्त करत आहेत.