मधुकर ठाकूर
उरण : गौरवशाली व शौर्यशाली लढ्यात आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या चिरनेर जंगल सत्याग्रहातील हुतात्म्यांचा ९३ वा स्मूतीदिन कार्यक्रम सोमवारी (२५) सप्टेंबर रोजी अगदी साधेपणाने साजरा करण्यात आला. यावेळी पोलीसांकडून बंदुकीच्या २१ फैऱ्या हवेत झाडत चिरनेर हुतात्म्यांना शासकीय मानवंदना देण्यात आली.वारंवार उद्भवणारी पुरपरिस्थिती, विकासाचा अभावामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी याआधीच ग्रामसभेत चिरनेर जंगल सत्याग्रहाचा ९३ वा हुतात्मा दिन अगदी साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय जाहीर केला होता. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ब्रिटिश सत्ते विरोधात २५ सप्टेंबर १९३० रोजी झालेल्या चिरनेरच्या जंगल सत्याग्रहात शांततेच्या मार्गाने लढा देणाऱ्या आंदोलनकर्त्यांवर जुलमी ब्रिटिश सरकारने बेछूट गोळीबार केला.या गोळीबारात उरण तालुक्यातील धाकू गवत्या फोफेकर ,नाग्या महादू कातकरी - ( चिरनेर),आलू बेमट्या म्हात्रे - (दिघोडे),आनंदा माया पाटील- (धाकटी जुई),रामा बामा कोळी- ( मोठी जुई), मोरेश्वर रघुनाथ शिंदे(न्हावी) - (कोप्रोली),परशुराम रामा पाटील -( पाणदिवे) व हसुराम बुधाजी घरत- (खोपटे) या आठ शूरविरांनी चिरनेर गावातील आक्कादेवीच्या माळरानावर वीर मरण आले.या रणसंग्रामाच्या स्मृतीना उजाळा मिळावा व युवा पिढी समोर आपल्या पुर्वजानच्या इतिहासाचे स्मरण व्हावे यासाठी चिरनेर ग्रामपंचायत व रायगड जिल्हा परिषदेच्या वतीने दरवर्षी चिरनेर येथे स्मृतीदिनाचा कार्यक्रम साजरा करण्यात येतो.
मात्र ऐतिहासिक चिरनेर गाव विकास कामांपासून कायमच वंचित राहिला आहे.आता तर धनदांडग्यांनी रस्ते, नाले आणि गावातील हद्दीत ठिकठिकाणी केलेल्या वाढत्या बेकायदेशीर अतिक्रमणे व बांधकामांमुळे चिरनेर गावात दरवर्षी पुरजन्य परिस्थिती निर्माण होऊ लागली आहे.या परिस्थितीचे निराकरण व्हावे यासाठी ग्रामस्थांनी संबंधित विभागाला वारंवार साकडे घातले आहे.
मात्र ग्रामस्थांच्या तक्रारींनंतरही शासकीय यंत्रणेकडून त्याकडे पुर्णपणे दुर्लक्षच केले जात आहे.यामुळे मात्र चिरनेर गावात दरवर्षी पुरजन्य परिस्थिती निर्माण होऊ लागली आहे.यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी १४ सप्टेंबर रोजी झालेल्या ग्रामसभेत शासकीय यंत्रणेवर रोष व्यक्त करीत चिरनेर जंगल सत्याग्रहाचा ९३ वा हुतात्मा दिन अगदी साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय जाहीर केला होता.याआधी कोरोना महामारीच्या काळातही दोन वर्षे स्मृतीदिन साधेपणाने साजरा करण्यात आला होता.
त्यामुळे हुतात्म्यांच्या वासरांचे सत्कार, विविध राजकीय पक्षांच्या पुढारी, नेत्यांच्या भाषणांना फाटा देत यावर्षी हुतात्मा दिन अगदी साधेपणाने साजरा करण्यात आला.यावेळी पोलीसांकडून बंदुकीच्या २१ फैऱ्या हवेत झाडत चिरनेर हुतात्म्यांना शासकीय मानवंदना देण्यात आली.