उरणमध्ये पक्षांचा किलबिलाट : खिडकीबाहेरचं पक्षी जग !

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2022 09:27 PM2022-09-10T21:27:47+5:302022-09-10T21:28:49+5:30

विविध प्रकारच्या झाडं-झुडपात विविध प्रकारच्या जातींचे आकर्षक पक्षी नजरेत पडू लागले आहेत. 

Chirping of birds in Uran bird world outside the window interesting story | उरणमध्ये पक्षांचा किलबिलाट : खिडकीबाहेरचं पक्षी जग !

उरणमध्ये पक्षांचा किलबिलाट : खिडकीबाहेरचं पक्षी जग !

Next

मधुकर ठाकूर 

उरण :  रखरखते ऊन आणि अधुनमधून बरसणाऱ्या जोरदार पाऊसानंतरही उरण परिसरातील शहरी- ग्रामीण भागातील गावातील घराशेजारी असलेल्या विविध प्रकारच्या झाडं-झुडपात विविध प्रकारच्या जातींचे आकर्षक पक्षी नजरेत पडू लागले आहेत. शहर-गावाकडील घराशेजारी असलेली आंबा,चिंच, कडूलिंब, वड,पिंपळ,करंज, ताड- माड, गुलमोहर, काट सावरीचे झाड,नारळी पोफळी आदि झाडांच्या फांद्यांवर आणि झाडं-झुडपात हे आकर्षक पक्षी स्वच्छंदपणे बागडताना दिसू लागले आहेत.

सुर्यपक्षी सहचारिणी सोबत फुलातील चोचीने मध गोळा करताना दृष्टीस पडतात. तर चित्रांग सारखे भांडखोर पक्षीही नजाकतीने दिसतात. काही जातीचे पक्षी कळपा-कळपाने विहार करताना आढळतात. काही जातीच्या पक्षांचा रंग सभोवतालच्या परिस्थितीशी जुळणारा असतो. त्यामुळे असे पक्षी चटकन नजरेला दिसत नाहीत.मोकळ्या किंवा दाट झाडाझुडपांतही विविध रंगी बहुढंगी पक्ष्यांचे थवेही नजरेत पडतात. धनेश सारखे पक्षी आसाम भागातुन येतात. छोटे-मोठे स्थलांतरित पक्षी वड, पिंपळ,उंबर आणि इतर झाडांबरोबरच गावानजिक असलेल्या बागबगीच्यांमध्येही बागडताना आढळुन येतात. पद्मपुष्प किंवा कस्तुर पक्षी इकडे-तिकडे उड्या मारत फिरत असतात.जास्त काळ उडता येत नसल्याने कस्तुर पक्षी थोडे अंतरच उडून जातात.

बुलबुल, साळुंकी, चिमणी, चित्रांगण, सुर्यपक्षी, खंड्या, सुरेल दयाळ,पोपट आदी पक्षी तर खिडकीच्या तावदाने, काचांवर चोची मारुन लक्ष वेधुन घेण्याचा प्रयत्न करीत असतात.अधुनमधुन सुगरण,लाल मुनिया, गुलाबी पिंच, कालशिर्ष भारीट, पर्वत कलर, चिरक, दयाळ, छोटा सातभाई, नर्तक, कोतवाल, सुतार,बैरागी, शेंदरी विष्फुलिफ, कालशिर्ष भारीट, जेरडीनचा क्लोरॉप्सिस, पिपिट,करडा धोबी, चेस्टनट पोटाचा नटहॅच, फुलटोच्या गप्पीदास,राखी वटवट्या, शिंपी, कस्तुर,टकाचोर,राखी खाटीक,छोटा हिरवा राघू,तांबट,तांबडा होला,हरतालिका,निलकंठ ,नारद, भारव्दाज,ताम्रहंस, आदि छोट्या-मोठ्या आकाराचे आकर्षक पक्षीही नजाकतीने खिडकीतून डोकावून पाहाताना हमखास नजरेत पडतात.

झाडे-झुडपे,बागबगीचे,गवताळ शेती,बांबूच्या वनात आकर्षक पाहुण्या पक्ष्यांची गर्दी वाढत आहे. अशा या खिडकी बाहेरच्या जगात स्वैरविहार करणार्‍या रंगेबेरंगी विविध जातीच्या आकर्षक पक्ष्यांच्या मनमोहक हालचालींने मन आणि  परिसरातील वातावरणही प्रफुल्लीत झाले होत आहे.

आकाशात स्वैरपणे विहार करणारे अनेक छोटे मोठे पक्षी नागरी वस्तीतही आढळून येऊ लागले आहेत.वादळीवाऱ्यात अनेक ठिकाणी झाडे जमीनदोस्त झाली आहेत. यामध्ये उंचावर राहाणाऱ्या अनेक पक्ष्यांची घरटीही तुटून पडली आहेत.पिल्लेही उघड्यावर आली आहेत.त्यामुळे विचलित आणि स्थलांतरित झालेले विविध जातींतील काही छोटे पक्षी आता नागरी वस्तीतील झाडाझुडुपांमध्ये दिसु लागले आहेत.काही पक्षांचा मिटिंग काळ संपुष्टात आलेले पक्षीही नागरी वस्तीकडे स्थलांतरित झाल्याचे आढळून येत असल्याचे वन्य जीव निसर्ग संरक्षण संस्थेचे अध्यक्ष विवेक केणी यांनी सांगितले.

Web Title: Chirping of birds in Uran bird world outside the window interesting story

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.