खारघर सीईटीपी प्लांटमध्ये क्लोरीन वायु गळती; मोठी घटना टळली
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2020 10:27 PM2020-11-05T22:27:43+5:302020-11-05T22:58:44+5:30
प्लांटची देखरेख करणारा कंत्राटदाराला याबाबत काहीच माहीत नसल्याचा आरोप समीर कदम यांनी केला आहे.
पनवेल :खारघर सेक्टर 16 मधील सीईटीपी प्लांट मध्ये गुरुवारी सायंकाळी 7.45 च्या सुमारास क्लोरीन या विषारी वायूची गळती झाल्याचा प्रकार घडला.या प्लांटमध्ये असलेला क्लोरीन वायूच्या सिलेंडरमधून हि गळती झाली असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली.
या गळतीची तीव्रता खूप जास्त असल्याने या प्लांट जवळ असलेले नागरिक तसेच अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना देखील काही प्रमाणात त्रास झाला असल्याची माहिती घटनेचे प्रत्यक्षदर्शी समीर कदम यांनी दिली.समीर कदम यांनीच अग्निशमन दलाला घटनेची माहिती दिली.घटनेची माहिती मिळताच सिडकोच्या अधिकाऱ्यांनी देखील घटनास्थळी धाव घेतली.यामध्ये अभियंता प्रफुल देवरे यांचा समावेश होता.
गळती झालेल्या क्लोरीन वायूची तीव्रता जास्त असल्याने याठिकाणच्या कर्मचाऱ्यांना श्वसनाचा व डोळ्यांमध्ये जळजळ होण्याचा त्रास जाणवत होता.या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.रात्री उशिरा पर्यंत सिलेंडरमधील गळती थांबविण्याचे काम सुरु होते.क्लोरीन वायु अतिशय विषारी असतो.सीईटीपी मधील दूषित पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी त्याचा वापर केला जातो.
विशेष म्हणजे याठिकाणी प्लांटची देखरेख करणारा कंत्राटदाराला याबाबत काहीच माहीत नसल्याचा आरोप समीर कदम यांनी केला आहे. सुरक्षेची देखील कोणतीच साधने नसल्याने तसेच कोणतीच प्रशिक्षित व्यक्ती याठिकाणी नसल्याने संबंधित कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी समीर कदम यांनी केली आहे.सेक्टर 16 परिसरात वास्तुविहार, सेलिब्रेशन हे गृहप्रकल्प आहेत.याठिकाणी 10 हजारपेक्षा जास्तीची लोकवस्ती आहे.