पनवेलमध्ये आठ स्वच्छतादूतांची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2018 02:28 AM2018-02-09T02:28:58+5:302018-02-09T02:29:07+5:30
स्वच्छ भारत अभियानांतर्गत राज्यभरातील महापालिकांनी वेगवेगळे स्वच्छतादूत नेमून नागरिकांना प्रोत्साहन देण्याचे काम हाती घेतले आहे. पनवेल महापालिकेनेही आठ स्वच्छतादूतांची निवड केली आहे.
पनवेल : स्वच्छ भारत अभियानांतर्गत राज्यभरातील महापालिकांनी वेगवेगळे स्वच्छतादूत नेमून नागरिकांना प्रोत्साहन देण्याचे काम हाती घेतले आहे. पनवेल महापालिकेनेही आठ स्वच्छतादूतांची निवड केली आहे. पालिकेने छाया तारलेकर, श्वेता क्रि ष्णन, सुधी किट्रो, डॉ. मंजुषा देशमुख, धनराज विसपुते, हरेश हरिदास, के. एम. वासुदेवन पिल्लई, एम. एन. राजू यांची स्वच्छतादूत म्हणून निवड केली आहे.
महापालिका परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी पनवेल पालिकेने जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. पनवेल महापालिकेला कलाकार भाऊ कदम व नेमबाज सुमा शिरूर यांच्या रूपाने सामाजिक भावनेतून मोफत काम करू इच्छणारे स्वच्छतादूत भेटले आहेत. स्वच्छ भारत अभियानाच्या विविध उपक्र मांत भाऊ कदम व सुमा शिरूर हजर राहून नागरिकांना प्रोत्साहन देणार आहेत.
पनवेल महापालिकेद्वारे परिसरात स्वच्छता अभियानाचे काम सुरू आहे. शहर स्वच्छ व सुंदर बनविण्यासाठी प्रशासन स्तरावर विविध विभागात कार्य करीत आहेत. स्वच्छतेसाठी नागरिकांनीही एकत्र येऊन सहकार्य करणे गरजेचे आहे. महापालिका हद्दीतील २० प्रभाग स्वच्छ व सुंदर बनविण्यासाठी स्पर्धा घेतली जात आहे. त्यानुसार प्रभागातील भिंती रंगविल्या जात आहेत, तर काही ठिकाणी सुविचार, सामाजिक संदेश देऊन स्वच्छता राखण्याचे आवाहन केले जात आहे. नागरिकांनी स्वत:च्या घरापासून स्वच्छतेची सुरुवात करावी व स्वच्छतेची गुणवत्ता टिकवावी, असे आवाहन पालिकेतर्फे करण्यात येत आहे. शहर स्वच्छ आणि सुंदर होण्याकरिता सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे आयुक्त सुधाकर शिंदे सांगत आहेत.
स्वच्छता अभियानांतर्गत महापालिकेने पुरेशा खतकुंड्या उभाराव्यात, नागरिकांकडून वेळच्या वेळी कचरा संकलन करावे, ओला व सुका कचरा वेगवेगळा करण्याबाबत जनजागृती मोहीम राबविण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आठ स्वच्छतादूतांची निवड केली असली, तरी महापालिकेला आणखी स्वच्छतादूतांची आवश्यकता आहे. त्यामुळे स्वच्छतादूत स्वच्छ व सुंदर पनवेलबाबत जनजागृतीसाठी रस्त्यावर उतरणार आहेत. स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यासाठी स्वच्छतादूतांना प्रयत्न करावे लागणार आहेत.
>प्रशासनाचे प्रयत्न
महापालिकेद्वारे परिसरात स्वच्छता अभियानाचे काम सुरू आहे. शहर स्वच्छ व सुंदर बनविण्यासाठी प्रशासन स्तरावर विविध विभागात कार्य करत आहेत. स्वच्छतेसाठी नागरिकांनीही सहकार्य करणे गरजेचे आहे.
>माझ्यावर सोपवलेली जबाबदारी व्यवस्थितरीत्या पार पाडणार आहे. स्वच्छतादूत म्हणून महापालिकेला सहकार्य करणार आहे.
- धनराज विसपुते,
स्वच्छतादूत, पनवेल