नवी मुंबई - माझे पसंतीचे सिडकोचे घर योजनेअंतर्गत ऑनलाइन अर्ज नोंदणीसह पसंतीचे घर निवडण्यासाठी ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे. याअगोदर २५ जानेवारीपर्यंत मुदत जाहीर केली होती. शनिवारी ती संपत आहे. ग्राहकांची गैरसोय होऊ नये, यादृष्टीने आता ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिल्याचे सिडकोने स्पष्ट केले आहे.
पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गट आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी सिडकोने २६ हजार घरांची योजना जाहीर केली आहे. नवी मुंबईच्या वाशी, बामणडोंगरी, खारकोपर, खारघर, तळोजा, मानसरोवर, खांदेश्वर, पनवेल आणि कळंबोली नोडमध्ये ही घरे उपलब्ध केली आहेत. यासाठी आतापर्यंत जवळपास दीड लाख अर्जदारांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे, तर ११ जानेवारीपासून पसंतीचे घर निवडण्याचा दुसरा टप्पा खुला केला आहे. त्यालासुद्धा ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचा दावा सिडकोने केला आहे.
सॅम्पल फ्लॅट उपलब्धशेवटच्या दिवसांत ऑनलाइन अर्ज नोंदणी करून शुल्क भरणाऱ्या ग्राहकांना पसंतीचे घर निवडताना अडचण होऊ नये, यादृष्टीने या प्रक्रियेला ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिल्याचे स्पष्ट केले आहे. ग्राहकांना घर निवडण्यापूर्वी घरांचे स्वरूप लक्षात यावे यादृष्टीने खारघर, सेक्टर-१४, खारघर (पूर्व) तळोजा, सेक्टर-३७ व खांदेश्वर, सेक्टर-२८ येथे सॅम्पल फ्लॅट उपलब्ध केले आहेत.