महापौर निवडणुकीसाठी चुरस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2020 11:14 PM2020-01-01T23:14:07+5:302020-01-01T23:14:10+5:30
पनवेलमध्ये ७ जानेवारीला अर्ज दाखल होणार
पनवेल : पनवेल महानगरपालिकेच्या विद्यमान महापौर डॉ. कविता चौतमोल यांचा अडीच वर्षांचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने लवकरच पनवेलला नवीन महापौर मिळणार आहे. महापौर निवडीचा कार्यक्र म जाहीर झाला असून, १० जानेवारी रोजी पनवेल महानगरपालिकेचा नवीन महापौर व उपमहापौर निवडला जाणार आहे. विशेष सभेमध्ये महापौर, उपमहापौर निवडीचा कार्यक्र म पार पडणार आहे.
पनवेल महानगरपालिकेच्या प्रथम महापौरपदी विराजमान होण्याचा मान पहिल्यांदाच निवडून आलेल्या डॉ. कविता चौतमोल यांना मिळाला. पेशाने डॉक्टर, उच्चशिक्षित असलेल्या डॉ. चौतमोल यांच्या निवडीचे पनवेलकरांनी स्वागत केले. खुल्या महिला प्रवर्गासाठी महापौरपद आरक्षित खुल्या प्रवर्गातील महिला नगरसेविकांना महापौरपदी विराजमान होण्याची संधी मिळणार आहे. यामध्ये मोजकीच नावे आहेत. खारघरमधील भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा व माजी महिला महिला बाळ कल्याण सभापती लीना अर्जुन गरड, संजना समीर कदम व नेत्रा किरण पाटील यांच्या नावाची चर्चा आहे. महापौरपदाचा मान पनवेलला मिळाल्याने दुसरी संधी खारघरला मिळावी, अशी खारघरवासीयांची अपेक्षा आहे. मीडियावर त्याचे पडसाद पाहावयास मिळत आहेत. ७ जानेवारी महापौरपदाकरिता नामनिर्देशित अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख आहे. उपमहापौर विक्रांत पाटील यांचा कार्यकाळही संपुष्टात आल्याने उपमहापौरपदी नवीन वर्षात नवीन चेहरा पाहावयास मिळणार आहे.
७ जानेवारी रोजी दुपारी १२ ते ३ या वेळेत महापौरपदासाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची मुदत आहे. १० रोजी दुपारी ३ वाजता याकरिता विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. महापौरपद कोणाला मिळणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.