पनवेल : इंडियन डेव्हलपमेंट फाऊंडेशनच्या वतीने यंदा नवीन वर्षाचे स्वागत व ख्रिसमस साजरा करताना आपल्या आनंदात अनाथ मुलांना सामील करून घ्यावयाचे, असे ठरवण्यात आले. त्यानुसार फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवार, २३ डिसेंबरला वांगणी येथील सील आश्रमात जाऊन, अनाथ मुलांबरोबर गाणी म्हणून, नाचून त्यांना केक व गिफ्ट देऊन ख्रिसमस साजरा के ला.फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर नारायण अय्यर, समाजसेवक रामकुमार, प्रिसीला मेस्त्री, कोलंबा कलीधर, सलमा मेमन, अंजन रॉय, जयश्री विकाजी, कायना मिस्त्री व खारघरच्या आयटीएमच्या प्रा. श्रीलजा पालूर आदी उपस्थित होते. या वेळी फादर के. एम. फिलिप्स, बिजू फादर, सिस्टर जैमिना, इंद्रजीत सिंग यांनी त्यांचे स्वागत करून, आश्रमाची माहिती दिली. या आश्रमात ४५ मुले व २१७ मनोरु ग्ण महिला व पुरु ष आहेत. यापैकी अनेक जणांना पोलिसांनी आणून सोडले आहे. काहींना आश्रमातील लोकांनी आणले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत ३०० जण घरी परतले आहेत. येथील मुलांमध्ये रस्त्यावर सापडलेली, व्यसनाधीन मुलेही आहेत. काही मुले पालकांनी आणून सोडली आहेत. येथे या मुलांची योग्य काळजी घेतली जात असून, सीलतर्फे रस्त्यावरील मुलांसाठी १ जानेवारीला ‘सील स्ट्रीट रन’ सायंकाळी ४ ते ६ या वेळेत वाशी सेक्टर १७ ते वाशी स्टेशन असे आयोजित करण्यात आले आहे. यामुळे नागरिक या गरज असलेल्या मुलांना मदतीचा हात द्यायला प्रवृत्त होतील. यामध्ये १ हजारपेक्षा जास्त स्वयंसेवक सामील होतील, असा अंदाज आहे. यामध्ये जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन सीलतर्फे करण्यात आले आहे.
सील आश्रमात ख्रिसमस साजरा
By admin | Published: December 24, 2016 3:26 AM