पनवेलमध्ये नाताळनिमित्ताने चर्च सजले; सलग सुट्ट्यामुळे सायन-पनवेल मार्गही चक्काजाम
By वैभव गायकर | Published: December 23, 2023 04:33 PM2023-12-23T16:33:55+5:302023-12-23T16:35:11+5:30
‘जिंगल बेल, जिंगल बेल, जिंगल ऑल दि वे’च्या सुरांमध्ये शहरात दरवर्षी नाताळचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
पनवेल: ख्रिश्चन बांधवांचा सर्वांत मोठा नाताळ सण अर्थात प्रभू येशूंचा जन्मोत्सव साजरा करण्यासाठी सर्वजण सज्ज झाले आहेत. पनवेल शहरातील चर्चना विद्युत रोषणाई करण्यात आली असून सकाळी सामूहिक प्रार्थना तर संध्याकाळी धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
‘जिंगल बेल, जिंगल बेल, जिंगल ऑल दि वे’च्या सुरांमध्ये शहरात दरवर्षी नाताळचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. ख्रिस्ती बांधव सकाळी चर्चमध्ये जाऊन प्रार्थना करतात. त्यानंतर सर्वत्र केक आणि ख्र्रिसमस ट्रीसह ठिकठिकाणी सांताक्लॉज अवतरतात. ख्रिस्ती बांधव एकमेकांना नाताळच्या शुभेच्छा देतात. नाताळचा उत्सास सर्वधर्मीयांमध्ये पाहायला मिळतो.दि.25 रोजी सोमवारी नाताळ सर्वत्र साजरा होणार आहे.याकरिता पूर्वतयारी पहावयास मिळत असून पनवेल शहरासह खारघर,कळंबोली,नवीन पनवेल मधील चर्चना आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
चर्चबाहेर असलेले चांदण्या, मेणबत्त्या, येशू ख्र्रिस्तांच्या जन्माचा देखावा, आदी तयारी पूर्ण झाली आहे.चर्चसह विविध खाजगी कार्यालये, घरामध्ये रंगीबेरंगी विद्युत रोषणाई, ख्रिसमस ट्री तसेच येशूच्या जन्मस्थळाच्या प्रतिकृती उभारण्यात आल्या आहेत. या उत्सवासाठी शहरात ठिकठिकाणी संगीताच्या कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे. पनवेलमधील विविध बाजारपेठा मध्ये नाताळ निमित्ताने विविध वस्तु ,सँटा कॅप,ट्री आदी विक्रीसाठी ठेवण्यात आले आहे.विशेष म्हणजे नवी मुंबई मधील विविध सिग्नलवर देखील क्रिसमसच्या निमित्ताने विविध वस्तुची विक्री विक्रेते करताना दिसून येत आहे.
सलग सुट्ट्यामुळे सायन पनवेल हायवे चक्काजाम
शनिवार,रविवार तसेच पुढे सोमवारी नाताळच्या सुट्ट्यामुळे नागरिक पर्यटनामुळे मोठ्या प्रमाणात शनिवारी घराबाहेर पडल्याने वाहनांची मोठी गर्दी सायन पनवेल महामार्गावर पहावयास मिळाली.खारघर,कळंबोली पुढे पळस्पे फाटा याठिकाणी वाहनांच्या रांगा पहावयास मिळाल्या.
शनिवार सकाळ पासूनच खारघर जवळ वाहनांची मोठी गर्दी पहावयास मिळाली.सलग सुट्ट्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिक बाहेर पडत असल्याने वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक शाखेचे सर्व कर्मचारी बंदोबस्तावर होते.
-संतोष काणे(वरिष्ठ पोलीस निरीक्षक , खारघर वाहतुक शाखा )