चिरनेरमधील खून व्यावसायिक वादातून
By admin | Published: June 24, 2017 01:02 AM2017-06-24T01:02:25+5:302017-06-24T01:02:25+5:30
चिरनेरमध्ये अर्शद सैफी या युवकाच्या खुनाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. व्यावसायिक स्पर्धेमधून मित्रानेच त्याचा खून केल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : चिरनेरमध्ये अर्शद सैफी या युवकाच्या खुनाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. व्यावसायिक स्पर्धेमधून मित्रानेच त्याचा खून केल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी तीन आरोपींना गुन्हे शाखेने अटक केली आहे.
अटक केलेल्या आरोपींमध्ये गोपाल रामसिंग राजपूत, सूरज राजन हिंदुराज नायर, राजासिंग अग्निदेवसिंग चौहान यांचा समावेश आले. मयत अर्शद सैफी व आरोपी गोपाल राजपूत हे दोघेही उलवे येथे बांधकाम साहित्य पुरविणाऱ्या कंपनीमध्ये एकत्रितपणे सुपरवायझर म्हणून नोकरी करत होते. नोकरी करताना संपर्क वाढल्याने अर्शद याने एप्रिल २०१६ मध्ये नोकरी सोडून स्वत:चा व्यवसाय सुरू केला. त्याच्या प्रगतीमुळे गोपाळ याच्या मनामध्ये ईर्षा निर्माण झाली होती. या दोघांमध्ये पूर्ववैमनस्यही होते. यामुळे अर्शदपासून गोपाळ याला स्वत:च्या जीवास धोका वाटू लागला होता. यामुळे त्याने त्याचे दुसरे दोन सहकारी सूरज नायर व राजासिंग चौहान यांच्या मदतीने त्याचा खून करण्याचा कट रचला होता. तिघांनी अर्शदला दारू पाजून स्कॉर्पिओ गाडीतून चिरनेरमध्ये नेले व गळा आवळून खून केला. मृतदेहाची ओळख पटू नये यासाठी त्याचा चेहरा दगडाने विद्रूप केला. ३१ मे रोजी ही घटना घडली होती.
पोलीस आयुक्त हेमंत नगराळे, सह पोलीस आयुक्त प्रशांत बुरडे, उपआयुक्त तुषार दोशी, नितीन कौसाडीकर व युनिट दोनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एन. बी. कोल्हटकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू होता. बबन जगताप, किरण भोसले, सुभाष पुजारी यांच्या पथकाने तपास करून २२ दिवसांमध्ये तीनही आरोपींना अटक केली आहे.