वैभव गायकर , पनवेलनवी मुंबईमधील दिवाळे कोळीवाड्यामधील बहिरीनाथाची यात्रा म्हणजे कोळीवाड्यासह आसपासच्या गावांना देवाच्या दर्शनासाठी मोठी उत्सुकता लागलेली असते. एक वर्ष पाण्यात थांबून स्वत: देव भक्तांच्या दर्शनाला येतो. गावाच्या यात्रेतून दिवाळेतील आगरी-कोळी बांधव दिवाळी साजरी करतात. पाच दशकांपासून ही परंपरा सुरू आहे. मंगळवारी देवाच्या शोधासाठी गावातील भक्त घारापुरी येथे होडीने जातात. त्यानंतर देवाची गावात स्थापना केली जाते. यावेळी ढोल, ताशांच्या गजरात पारंपरिक कोळी - आगरी गीते गावून देवाचे स्वागत केले जाते. नवी मुंबई स्मार्ट सिटी म्हणून उदयास येत आहे. याठिकाणची मूळ ग्रामस्थ त्याची परंपरा जपत आहेत. या परंपरेत दिवाळे गावातील भैरीनाथाच्या यात्रेचा समावेश आहे. भैरीनाथाची मूर्ती वर्षभर घारापुरी येथील समुद्रात असते. नरकचतुर्दशीच्या दिवशी गावातील शेकडो ग्रामस्थ होड्यांच्या सहाय्याने समुद्रात मोठ्या काठीच्या सहाय्याने देवाचा शोध घेतात. त्यानंतर गावातील मनोज कोळी या ग्रामस्थाच्या घरी देवाची स्थापना केली जाते. देवाच्या दर्शनासाठी ठाणे, रायगड जिल्ह्यातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने दिवाळे गावात येत असतात. देवाच्या सेवेसाठी सत्तर वर्षांच्या वयोवृद्ध कृष्णाई कोळी रात्रंदिवस झटत असतात. महाराजांचा पालखी सोहळा आमच्यासाठी वर्षभरातील सर्वात मोठा सण असल्याचे रमेश संभाजी कोळी या ग्रामस्थाने सांगितले. यावेळी कोळीवाड्यात मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतषबाजी, दिव्यांची रोषणाई केली जाते. कोळी महिला देखील पारंपरिक पद्धतीने कोळी नृत्य सादर करतात. पालखी सोहळ्यानंतर विसर्जन रात्रभर जल्लोषात बहिरीनाथ महाराजांची सेवाअर्चा केल्यानंतर दुसऱ्या दिवशी गुरु वारी महाराजांना निरोप देण्यात येणार आहे. यावेळी संपूर्ण कोळीवाडा विसर्जन यात्रेत सहभागी होत असतात. वर्षभर कोळी बांधव समुद्रात मच्छीमारी करीत असतात, त्यांचे रक्षण भैरीनाथ महाराज करीत असल्याची प्रतिक्रि या उदय जोशी या ग्रामस्थांनी दिली.
बहिरीनाथाच्या शोधासाठी समुद्रमंथन
By admin | Published: November 11, 2015 12:23 AM