सिडकोला पुन्हा गृहनिर्मितीचे वेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 02:23 AM2018-06-19T02:23:44+5:302018-06-19T02:23:44+5:30
गृहबांधणीच्या आपल्या मूळ धोरणाला बगल देत केवळ भूखंडांच्या ट्रेडिंगवर भर देणाऱ्या सिडकोला आता गृहबांधणीचे महत्त्व पटू लागले आहे.
- कमलाकर कांबळे
नवी मुंबई : गृहबांधणीच्या आपल्या मूळ धोरणाला बगल देत केवळ भूखंडांच्या ट्रेडिंगवर भर देणाऱ्या सिडकोला आता गृहबांधणीचे महत्त्व पटू लागले आहे. त्यामुळेच लवकरच आणखी २५ हजार घरे बांधण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. सध्या १५ हजार घरांच्या प्रकल्पाचे काम सुरू आहे. त्याबरोबरच नवीन २५ हजार घरे बांधली जाणार आहेत. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत ही घरे बांधण्याचा निर्णय घेतला आहे.
सध्या नवी मुंबईतील घरांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांच्या गृहस्वप्नांना खीळ बसली आहे. शहराची निर्मिती करताना गृहबांधणी हे सिडकोचा मुख्य उद्देश होता. परंतु कालांतराने सिडकोने आपल्या मूळ धोरणापासून फारकत घेत भूखंडांच्या विक्रीवर भर दिला. बोली पध्दतीने भूखंडांची विक्री सुरू केल्याने भूखंडांचे दरही गगनाला भिडले आहेत. त्यामुळे अपोआपच घरांच्या किमती वाढल्या आहेत. घरांच्या किमती वाढीला सिडकोचे व्यावसायिक धोरण जबाबदार असल्याचा नेहमी आरोप केला जात आहे. या पार्श्वभूमीवर सिडको पुन्हा गृहबांधणीवर भर देणार आहे.
शहराची निर्मिती करताना सिडकोने सुरुवातीच्या वीस वर्षांत जवळपास १ लाख २४ हजार घरांची निर्मिती केली. त्यानंतर दहा ते पंधरा वर्षे गृहनिर्मितीकडे पाठ फिरविली. मागील काही वर्षात अपवादात्मक स्वरूपात खारघर, तळोजा तसेच उलवे येथे काही प्रमाणात घरांची निर्मिती करण्यात आली. परंतु मागणीच्या प्रमाणात ही घरे अत्यल्प असल्याने घरांची प्रतीक्षा यादी वाढतच आहे. आजमितीस सिडकोच्या घरांसाठीची प्रतीक्षा यादी खूप मोठी आहे. सर्वसामान्यांना आजही सिडकोच्या गृहप्रकल्पांवर दांडगा विश्वास आहे. त्यामुळेच येत्या काळात गृहनिर्मितीवर अधिक भर देण्याचा निर्णय सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी घेतला आहे.
नवी मुंबई क्षेत्रात विविध आर्थिक घटकांसाठी पाच वर्षांत सिडको ५५ हजार घरे बांधणार आहे. मागील दोन-तीन वर्षांत यापैकी जवळपास पाच हजार घरे बांधण्यात आली आहेत. तर अल्प व अत्यल्प उत्पन्न घटकांसाठी १५ हजार १५२ घरांच्या प्रकल्पाचे नियोजन पूर्ण झाले आहे. घणसोली, खारघर, कळंबोली, तळोजा व द्रोणागिरी या नोडमध्ये ही घरे बांधली जात आहे. या गृहप्रकल्पांचे काम सुरू असतानाच लागोपाठ आणखी २५ हजार घरांची निर्मिती करण्याचा निर्णय लोकेश चंद्र यांनी घेतला आहे. एकूणच येत्या काळात घरांच्या बाबतीत मागणी तसा पुरवठा हे धोरण राबविणार असल्याचे लोकेश चंद्र यांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले आहे. विशेष म्हणजे गृहप्रकल्प पूर्ण झाल्यानंतरच घरांच्या विक्रीसाठी अर्ज मागविण्याची सिडकोची आतापर्यंतची पध्दत होती. परंतु आता गृहप्रकल्पाच्या कामाला सुरुवात होण्यापूर्वीच विक्रीसाठी अर्ज मागविण्याचा सुधारित निर्णय सिडकोने घेतला आहे. कारण सिडकोसुध्दा महारेराच्या कक्षेत येत असल्याने निर्धारित वेळेत ग्राहकांना घरांचा ताबा देणे बंधनकारक असणार आहे.