नवी मुंबई: सिडकोच्या वतीने शहरातील पाच नोडमध्ये अकरा ठिकाणी उभारण्यात येत असलेल्या गृहप्रकल्पातील घरांची सोडत प्रक्रिया सकाळी 11 वाजल्यापासून सुरु झाली आहे. ही सोडत म्हाडाच्या धरतीवर संगणकीय प्रणालीद्वारे काढली जात आहे. त्यासाठी म्हाडाचे उच्च अधिकारी व तज्ज्ञ सोडतीला उपस्थित आहेत. परिक्षण समितीच्या देखरेखीखाली अगदी नियोजनबद्धरित्या ही सोडत संपन्न होत आहे.
आर्थिक दुर्बल आणि अत्यल्प उत्पन्न गटासाठी असलेल्या 14838 घरांसाठी 1 लाख 91 हजार 613 इतके अर्ज सोडतीसाठी पात्र ठरले आहेत. यातील विविध प्रवर्गाच्या आरक्षणासह 22 फे-यात ही सोडत काढली जात आहे. त्यामुळे सोडत प्रक्रिया पूर्ण होण्यास संध्याकाळचे 7 वाजतील, असे सिडकोच्या संबंधित विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
विशेष म्हणजे, या सोडतीचे थेट प्रक्षेपण सिडकोच्या अधिकृत संकेतस्थळार केले जात आहे. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र, मुख्य दक्षता अधिकारी विनय कारगांवकर, सह व्यवस्थापकीय संचालिका प्राजक्ता लवांगरे-वर्मा, पणन विभागाचे व्यवस्थापक लक्ष्मीकांत डावरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही सोडत संपन्न होत आहे.