नववर्षात सिडको बांधणार पाच हजार घरे; नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2021 11:58 AM2021-12-15T11:58:56+5:302021-12-15T11:59:17+5:30
जानेवारी महिन्यात सिडकोच्या सुमारे पाच हजार घरांची सोडत काढण्यात येणार आहे.
कमलाकर कांबळे
नवी मुंबई : जानेवारी महिन्यात सिडकोच्या सुमारे पाच हजार घरांची सोडत काढण्यात येणार आहे. ही घरे घणसाेली, खारघर, कळंबोली, तळोजा आणि द्रोणागिरी या नोडमध्ये असणार आहेत. राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी ही माहिती दिली.
यापूर्वीची घरे पंतप्रधान आवास योजनेसाठी होती. मात्र, नवीन वर्षात घोषणा होणारी पाच हजार घरे सर्वसामान्य घटकांसाठी असणार आहेत. विशेष म्हणजे मध्यम व उच्च आर्थिक गटातील ग्राहकांना या योजनेद्वारे घराचे स्वप्न पूर्ण करता येईल, असे सिडकोच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत सिडकोने गेल्या तीन वर्षांत २४ हजार घरे बांधली आहेत. त्यातील पात्र ग्राहकांना सध्या घराचा ताबा देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे सिडकोच्या नवीन गृहयोजनेची ग्राहकांना प्रतीक्षा होती. दिवाळीच्या मुहूर्तावर गृहयोजना जाहीर केली जाण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. मात्र, विविध कारणांमुळे हा मुहूर्त टळला, असे असले तरी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आता नवीन गृहयोजनेबाबत घोषणा केली आहे.
सिडकोने गृहनिर्मितीवर अधिक भर दिला आहे. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत पुढील चार वर्षांत ८७ हजार घरे बांधण्याचे सिडकोचे उद्दिष्ट्य आहे. नवी मुंबईच्या विविध २७ ठिकाणी या घरांचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे. टप्प्याटप्प्याने २०२५ पर्यंत या घरांचा ताबा देण्याची सिडकोची योजना आहे. कोविड योद्धे आणि गणवेषधारी कर्मचाऱ्यांसाठी सिडकोने अलीकडेच विशेष गृहयोजना जाहीर केली होती. त्यातील यशस्वी ठरलेल्या अर्जदारांना २०२२ पर्यंत घरांचा ताबा दिला जाणार आहे.
नवी मुंबईच्या विविध भागांत घरे बांधली जाणार आहे. खासगी विकासकांपेक्षा ही घरे स्वस्त असणार आहेत. काही ठिकाणी घरांच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात आली आहे. अर्ज स्वीकारणे, सोडत आणि ताबा या प्रक्रिया गतिमान करण्यावर सिडकोचा भर असणार आहे. त्यानुसार नियोजन करण्यात आले आहे.
डॉ. संजय मुखर्जी, व्यवस्थापकीय संचालक, सिडको