सिडको इमारतींची दुरवस्था
By admin | Published: July 7, 2016 03:06 AM2016-07-07T03:06:14+5:302016-07-07T03:06:14+5:30
खांदा कॉलनीतील सिडकोच्या ए टाईप इमारतींची दुरवस्था झाली आहे. इमारती पूर्णत: मोडकळीस आल्याने येथील रहिवासी जीव मुठीत घेवून जीवन जगत आहेत. या पार्श्वभूमीवर
- वैभव गायकर, पनवेल
खांदा कॉलनीतील सिडकोच्या ए टाईप इमारतींची दुरवस्था झाली आहे. इमारती पूर्णत: मोडकळीस आल्याने येथील रहिवासी जीव मुठीत घेवून जीवन जगत आहेत. या पार्श्वभूमीवर या इमारतींची पुनर्बांधणी कधी होणार, असा सवाल रहिवाशांनी उपस्थित केला आहे.
ए टाईपच्या येथील प्रभुकुंज इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील ९ क्रमांकाच्या खोलीचा रविवारी स्लॅब कोसळला. या दुर्घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही. मात्र या घटनेनंतर येथील रहिवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सिडकोने १९९0 च्या सुमारास या परिसरात गजानन , विशाल , त्रिमूर्ती व प्रभुकुंज अशा ए टाईपच्या इमारती उभारल्या आहेत. या चारही इमारतीत जवळपास ३९६ सदनिका आहेत. यात बहुतांशी मध्यमवर्गीय कुटुंबे राहतात. नोकरी आणि घर असे नित्याचे वेळापत्रक असलेल्या या रहिवाशांचा जीव टांगणीला लागला आहे. कारण इमारती पूर्णत: मोडकळीस आल्या असून राहण्यास धोकादायक बनल्या आहेत.
सध्या पावसाचे दिवस असल्याने मुसळधार पावसामुळे या इमारतीमधील प्लास्टर निखळण्याच्या घटनांत वाढ झाली आहे. त्यामुळे रहिवाशांत भीतीचे वातावरण पसरले आहे. घरांचे दर गगनाला भिडल्याने मोडकळीस आलेले हे घर सोडून अन्यत्र स्थलांतरितही होता येत नाही. अशा परिस्थितीत दाद कोणाकडे मागायची, असा प्रश्न येथील रहिवाशांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान, या इमारतीचे स्ट्रक्चरल आॅडिटही केले आहे. त्यानंतरही या इमारतींच्या पुनर्बांधणीकडे लक्ष दिले जात नसल्याची खंत रहिवाशांनी व्यक्त केली आहे.
रविवारी प्रभुकुंज सोसायटीत घडलेल्या घटनेनंतर आम्ही त्वरित दुरु स्तीचे काम हाती घेतले आहे. या सर्व इमारतीचे स्ट्रक्चरल आॅडिट झालेले आहे. त्यांच्या पुनर्बांधणीचा निर्णय योजना विभागाचा आहे.
- सुधाकर विसाळे,
प्रशासकीय अधिकारी सिडको
मागील दहा वर्षांपासून या इमारतीच्या पुनर्बांधणीचा मुद्दा सिडको दरबारी मांडत आहोत. एखादा रहिवासी जीवानिशी गेल्यावर सिडकोला जाग येणार आहे का? त्यामुळे लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लावणे गरजेचे बनले आहे.
- शिवाजी थोरवे, माजी नगरसेवक