- कमलाकर कांबळे नवी मुंबई : सिडकोने मुलुंड येथे १८00 खाटांचे खास कोविड रुग्णालय उभारण्याचे काम हाती घेतले आहे. सध्या रूग्णालयाच्या बाह्य सांगाड्याचे काम सुरू आहे. पुढील पंधरा दिवसांत काम पूर्ण करून ते राज्य सरकारच्या सुपुर्द केले जाणार आहे.
मुंबईसह एमएमआर क्षेत्रात कोरोनाच्या रुग्णांत लक्षणीय वाढ झाली आहे. महिनाभरातील कोरोना रुग्णांची संभाव्य वाढ गृहीत धरून राज्य सरकारने मुंबई, मुलुंड तसेच ठाणे येथे कोविड रुग्णालय उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये १00८ खाटांचे खास कोविड रुग्णालय उभारण्याचे काम सुरू करण्यात आले असून ते सध्या अंतिम टप्प्यात आले आहे. सदर रुग्णालय एमएमआरडीएच्या माध्यमातून उभारण्यात येत आहे. त्याचप्रमाणे राज्य सरकारच्या निर्देशानुसार सिडकोने मुलुंड येथील आर मॉलच्या जवळील साधारण २0 एकर जागेवर सुमारे १८00 खाटांची क्षमता असलेले कोविड रुग्णालय उभारण्याचे काम हाती घेतले आहे.
सध्या या रुग्णालयाच्या बाह्य स्ट्रक्चरचे काम सुरू असून साधारण जूनच्या पहिल्या आठवड ते बांधून पूर्ण होईल, असे सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी लोकमतशी बोलताना स्पष्ट केले आहे. या रुग्णालयात अत्याधुनिक दर्जाच्या सुविधा असणार आहेत. कोरोनाची सूक्ष्म लक्षणे असणारे व लक्षणे नसलेल्या रुग्णांवर येथे उपचार केले जाणार आहेत. तसेच ज्यांना घरात जागा नसल्याने होम क्वारंटाइन करणे शक्य नसेल त्यांना येथे आयसोलेशनमध्ये ठेवण्याची सुविधा असणार आहे. सिडकोच्या सहव्यवस्थापकीय संचालक अश्विन मुदगल यांच्या देखरेखीखाली कोविड रुग्णालयाचे काम सुरू असून ते वेळेत पूर्ण व्हावे यादृष्टीने पाठपुरावा सुरू आहे.
सिडकोने स्वीकारली जबाबदारी
मुलुंड येथील कोविड रुग्णालय सिडकोने एमएमआरडीएच्या संयुक्त सहकार्यातून उभारण्याचा मूळ प्रस्ताव होता. परंतु एमएमआरडीए बीकेसी येथे १00८ खाटांचे अत्याधुनिक दर्जाचे कोविड रुग्णालय उभारत असल्याने मुलुंड येथील रुग्णालय उभारण्याची संपूर्ण जबाबदारी सिडकोने स्वीकारल्याचे समजते.