सिडकोने घरांच्या सोडतीची तारीख पुन्हा बदलली; आता १९ जुलैला ठरणार भाग्यवंत कोण?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2024 08:55 AM2024-07-11T08:55:29+5:302024-07-11T08:55:36+5:30

अर्जदारांत पुन्हा संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून, आता १९ जुलैला तरी सोडत होणार का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

CIDCO changed the date of house draw again | सिडकोने घरांच्या सोडतीची तारीख पुन्हा बदलली; आता १९ जुलैला ठरणार भाग्यवंत कोण?

सिडकोने घरांच्या सोडतीची तारीख पुन्हा बदलली; आता १९ जुलैला ठरणार भाग्यवंत कोण?

नवी मुंबई : सिडकोने घरांच्या सोडतीची तारीख पुन्हा बदलली आहे. त्यानुसार आता घरांची संगणकीय सोडत १९ जुलै रोजी होणार असल्याचे सिडकोच्या संबंधित विभागाने स्पष्ट केले आहे. तीन दिवसांपूर्वी जाहीर केलेला १६ जुलैचा मुहूर्त काही तांत्रिक अडचणींमुळे रद्द करण्यात आल्याचे सिडकोने कळविले आहे. त्यामुळे अर्जदारांत पुन्हा संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून, आता १९ जुलैला तरी सोडत होणार का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

सिडकोने प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर तळोजा आणि द्रोणागिरी नोडमधील ३,३२२ घरांची योजना जाहीर केली होती. या घरांसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची अंतिम मुदत १६ एप्रिल होती, तर पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार संगणकीय सोडत १९ एप्रिलला होणे अपेक्षित होते. मात्र, लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे १९ एप्रिलची पूर्वनियोजित सोडत पुढे ढकलून ७ जूनचा मुहूर्त निश्चित केला होता. त्यानंतर ५ जुलैपर्यंत विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली. त्यानंतर सोडत निघणे अपेक्षित होते. मात्र, सध्या सुरू असलेल्या विधिमंडळ अधिवेशनाचे कारण पुढे करीत घरांच्या सोडतीसाठी सिडकोने १६ जुलैची तारीख निश्चित केली. विशेष म्हणजे ७ जुलै रोजी सिडकोने आपल्या अधिकृत पोर्टलवर याबाबत सूचनाही प्रसारित केली होती. त्यामुळे मागील चार महिन्यांपासून सोडतीच्या प्रतीक्षेत असलेल्या अर्जदारांना दिलासा मिळाला होता; परंतु आता १६ जुलैऐवजी १९ जुलैचा मुहूर्त ठरविण्यात आल्याने अर्जदारांत पुन्हा संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

आता तारीख बदलणार नाही

• घरांच्या सोडतीची तारीख आता बदलली जाणार नसल्याचे सिडकोच्या संबंधित विभागाने स्पष्ट केले आहे. सिडको भवनच्या सातव्या मजल्यावरील सभागृहात १९ जुलै रोजी सकाळी ११ वाजता ही संगणकीय सोडत होणार आहे.

• सोडतीनंतर त्याच दिवशी सायंकाळी ६ वाजता सोडतीत यशस्वी झालेल्या लाभार्थ्यांची यादी जाहीर केली जाणार आहे, तर सोडतीत अयशस्वी ठरलेल्या अर्जदारांना २९ जुलैला अर्जासोबत भरलेल्या अनामत रकमेचा परतावा दिला जाणार असल्याचेही सिडकोने स्पष्ट केले आहे.
 

Web Title: CIDCO changed the date of house draw again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.