पनवेल : सिडकोच्या विविध विभागात सफाई कामगार म्हणून कार्यरत असलेले १३०० पेक्षा जास्त सफाई कामगार १२ तारखेपासून कामबंद आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. अनेक वर्षे प्रलंबित मागण्यांबाबत सिडको प्रशासनाने काहीच निर्णय घेतला नसल्याने कामगारांनी कोकण श्रमिक संघ या संघटनेच्या माध्यमातून या आंदोलनाचा पवित्रा घेतला. खांदा वसाहत येथे झालेल्या सभेत कामगार नेते श्याम म्हात्रे यांनी याबाबत माहिती दिली. कामगारांच्या या मागण्या मान्य करा, अशी मागणी म्हात्रे यांनी सिडकोकडे केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार, समान काम समान वेतन या तत्त्वानुसार सफाई, वाहतूक, पाणीपुरवठा, कँटीन आदी विभागातील सर्व कामगारांना कायमस्वरूपी कामगारांप्रमाणे वेतन व सवलती देण्यात याव्यात, बोनस मिळावा, या कामगारांचा ३ लाखापर्यंत आरोग्य विमा काढण्यात यावा आदी मागण्यांचा यात समावेश आहे. विशेष म्हणजे २०१४ पासून या कामगारांचा पगार एक रुपयानेही वाढलेला नाही. सिडकोने कामगारांच्या मागण्यांचा गांभीर्याने विचार करावा, अशी मागणी सभेमध्ये करण्यात आली. सभेत संघटनेच्या सचिव सुमन कदम, श्रुती म्हात्रे, नारायण कडू, बत्ती सिंग, नंदा कोळी आदींसह शेकडो कामगार उपस्थित होते. सिडकोच्या विविध विभागातील १३०० कंत्राटी कामगार संपावर केल्यास नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागेल. मात्र कामगारांच्या न्यायहक्कासाठी हा लढा उभारला असून नागरिकांना त्रास देण्याचा उद्देश नसल्याचे कामगार नेते श्याम म्हात्रे यांनी सांगितले. त्यामुळे सिडको व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांनीच यासंदर्भात दखल घेऊन कामगारांच्या मागणीवर तोडगा काढावा, असे म्हात्रे यांनी सांगितले. (वार्ताहर)
सिडकोचे सफाई कामगार आजपासून संपावर
By admin | Published: April 11, 2017 2:21 AM