नवी मुंबई : गेल्यावर्षी जुलै महिन्यात मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालेल्या इर्शाळवाडीतील आपद्वस्तांच्या पुनर्वसनाचा प्रकल्प सिडकोने निर्धारित वेळेत पूर्ण केला. परंतु, विविध कारणांमुळे या घरांचे वाटप लांबणीवर पडले आहे. असे असले तरी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी म्हणजेच दसऱ्याच्या मुहूर्तावर आपढ्रस्तांना त्यांच्या हक्काच्या घरांचे वाटप होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. २७ जुलै २०२३ ला झालेल्या मुसळधार पावासामुळे दरड कोसळून जीवितहानी होऊन इर्शाळवाडीतील ४४ कुटुंबे बेघर झाली होती.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या दरडग्रस्तांचे पुनर्वसन करण्याचे निर्देश रायगड जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. २.६ हेक्टर जागेवर राज्य रस्ते विकास महामंडळाने तयार केलेल्या विकास आराखड्यानुसार सिडकोने पुनर्वसन प्रकल्प उभारला. स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर घरांचे वाटप होईल, अशी अटकळ होती. मात्र, हाही मुहूर्त हुकल्याने आपद्वस्त हवालदिल झाले. ऑक्टोबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात आचारसंहिता जारी होण्याची शक्यता व्यक्त आहे. त्यानुसार ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात म्हणजेच दसऱ्याच्या मुहूर्तावर या पुनर्वसन प्रकल्पाचे लोकार्पण होईल, अशी अटकळ बांधली जात आहे.
लवकरच कार्यवाही
विशेष म्हणजे सिडकोने हा प्रकल्प निर्धारित कालावधीत पूर्ण केला आहे. पुढील कार्यवाहीसाठी तो जिल्हाधिकाऱ्यांकडे हस्तांतरित केला जाणार आहे.
त्याबाबत सिडकोने संबंधित तहसील कार्यालयाला यापूर्वीच पत्र दिले आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत त्यावर कार्यवाही होण्याची शक्यता सिडकोच्या संबंधित विभागाने व्यक्त केली आहे.