सिडकोचा कंत्राटी कामगारांवर अन्याय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2016 02:11 AM2016-01-05T02:11:30+5:302016-01-05T02:11:30+5:30
सिडकोमध्ये विविध पदांवर कंत्राटी पद्धतीने मागील ३ ते ४ वर्षांपासून काम करीत असलेल्या कामगारांना किमान वेतन कायदा व इतर लागू शासकीय भत्त्त्यानुसार वेतन
वैभव गायकर, पनवेल
सिडकोमध्ये विविध पदांवर कंत्राटी पद्धतीने मागील ३ ते ४ वर्षांपासून काम करीत असलेल्या कामगारांना किमान वेतन कायदा व इतर लागू शासकीय भत्त्त्यानुसार वेतन देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. अथर्व फॅसिलिटी सोल्युशन या एजन्सीमार्फत सिडको महामंडळात विविध पदांवर एकूण ३२६ कामगार कार्यरत आहेत. समाजसेवक प्रभाकर जोशी यांनी याकरिता पुढाकार घेतला असून, यासंदर्भात सिडकोच्या सहव्यवस्थापकीय संचालक व्ही. राधा यांना पत्र लिहून कामगारांना न्याय देण्याची मागणी केली आहे.
यासंदर्भात १९ मे २०१५ रोजीच्या बोर्ड ठरावामध्ये किमान वेतन कायदा व इतर सर्व लागू भत्ते व कॉन्ट्रक्ट प्रॉफिट देण्याचा उल्लेख केला आहे. मात्र एजन्सीच्या कामगारांना अद्याप कोणत्याही प्रकारच्या सुविधा देण्यात आल्या नसल्याने कामगारदेखील आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. अथर्व फॅसिलिटी सोल्युशन या एजन्सीमार्फत कंत्राटी कामगारांमध्ये फायरमन १६, अभियंता ३६, सर्व्हेअर १०, स्टेनो ४, लिपिक ३८ , सीओ ९८ , सीटी ८०, ड्रायव्हर ३७, लॉ असिस्ट ७ आदी कामगार कार्यरत आहेत. वारंवार मागणी करूनदेखील अद्याप याबाबत कोणतीच कारवाई करण्यात आली नसल्याने कामगारांना सोबत घेऊन आंदोलन करणार असल्याची माहिती प्रभाकर जोशी यांनी दिली. शासनाने तशा प्रकारचा ठराव करून सिडको त्याची अंमलबाजवणी करीत नाही, हा कामगारांवरील अन्याय आहे. यासंदर्भात वारंवार पाठपुरावा, पत्रव्यवहार करूनही सिडकोने दखल घेतली नसल्याने प्रशांत ठाकूर यांच्याकडे देखील पाठविले असल्याचे जोशी यांनी सांगितले .