नवी मुंबई : शहराचा लौकिक असलेल्या बेलापूर येथील पारसिक डोंगराच्या सपाटीकरणाचा धडाका सिडकोने पुन्हा एकदा सुरू आहे. विकासाच्या नावाखाली २०० भूखंडासाठी त्याची कापणी केली जात आहे. त्यासाठी हजारो वृक्षांचा बळी घेतला जात आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने ही बाब धोकादायक असून पावसाळ्यात भूस्ख्खलन होऊन दरडी कोसळण्याची भीती पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केली आहे. डोंगर पोखरण्चा हा प्रकार त्वरित थांबवा, अशी मागणी पर्यावरणप्रेमींनी नवी मुंबई महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्यासह मुख्यमंत्र्याकडे केली आहे. पारसिक डोंगरावर मोठ्याप्रमाणात बांधकामे केली जात आहेत. सिडकोने या ठिकाणी अनेक भूखंड रेखांकित करून त्याची विक्री सुरू केली आहे. त्यासाठी डोंगराचा बळी घेतला जात असून जेसीबी लाऊन त्याची कापणी केली जात आहे. यासंदर्भात नाट कनेक्ट फाउंडेशन या संस्थेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह ठाणे जिल्ह्याचे मुख्य वनसंवर्धक एस.व्ही रामाराव यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे.
संपूर्ण वाढलेल्या झाडांचा बळी?हिलवर अंदाजे २०० भूखंड चिन्हांकीत केले आहेत. त्यापैकी जवळपास शंभर भूखंडांचे वाटप पूर्ण झाले. उर्वरित भूखंडांसाठी टेकडीचे सपाटीकरण केले जात आहे. त्यासाठी संपूर्ण वाढलेल्या झाडांचा बळी घेतला जात असल्याचा आरोप हरितप्रेमींनी केला आहे. मात्र, व्यापारी सिडकोने पर्यावरणाचा ऱ्हास करून आपले डोंगर पोखरण्याचे काम सुरूच ठेवल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
मुख्यमंत्र्यांच्या आदेशाकडे वनविभागाचे दुर्लक्षविशेष म्हणजे यापूर्वी सुद्धा या टेकडीच्या कापणीसंदर्भात मुख्यमंत्र्याकडे तक्रार केली होती. त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी हे प्रकरण कारवाईसाठी वन विभागाकडे सुपुर्द केले होते. त्यानंतर काही दिवस पारसिक डोंगर कापण्याचे काम थांबले होते. परंतु, आता त्याच्या पूर्वेकडील बाजूला पुन्हा जेसीबी लावून सपाटीकरणाचे काम सुरू असल्याचे नाट कनेक्ट फाउंडेशनचे संचालक बी.एन. कुमार यांनी स्पष्ट केले आहे.रविवारपासून पारसिकच्या रहिवासी बाजूला नवीन स्थळावर कापणी सुरू केली आहे. येथील रहिवासी विष्णू जोशी यांनी यासंदर्भात चिंता व्यक्त करून पावसाळ्यात दरड कोसळण्याची भीती असल्याने ही कापणी थांबविण्याची विनंती महापालिकेकडे केली आहे.