सिडको कर्मचारी झाले दक्ष
By admin | Published: July 27, 2015 02:45 AM2015-07-27T02:45:11+5:302015-07-27T02:45:11+5:30
सिडकोच्या दक्षता विभागामुळे कर्मचारी दक्ष बनले आहेत. त्यामुळे भ्रष्टाचाराच्या विविध प्रकरणांमुळे मलीन झालेली सिडकोची प्रतिमा सुधारू लागली
कमलाकर कांबळे , नवी मुंबई
सिडकोच्या दक्षता विभागामुळे कर्मचारी दक्ष बनले आहेत. त्यामुळे भ्रष्टाचाराच्या विविध प्रकरणांमुळे मलीन झालेली सिडकोची प्रतिमा सुधारू लागली आहे. त्याचप्रमाणे कामकाजातही गतिमानता व पारदर्शकता आल्याने भ्रष्टाचाराच्या तक्रारींना आळा बसला आहे.
भ्रष्टाचाराच्या विविध प्रकरणांमुळे सिडकोची प्रतिमा मलीन झाली आहे. ही प्रतिमा पुसून टाकण्यासाठी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया यांनी प्रयत्न चालविले आहे. त्यांच्या या प्रयत्नांना मागील वर्षभरात चांगलेच यश प्राप्त झाले आहे. विविध विभागात रुजलेली भ्रष्टाचाराची पाळेमुळे उखडून टाकण्यासाठी त्यांनी वर्षभरापूर्वी सिडकोत स्वतंत्र दक्षता विभाग सुरू केला. या विभागाच्या प्रमुख म्हणून पोलीस महासंचालक दर्जाच्या डॉ. प्रज्ञा सरवदे यांची नियुक्ती करण्यात आली. डॉ. सरवदे यांनी मागील वर्षभरात भ्रष्टाचार निर्मूलनासाठी विविध उपक्रम राबविले आहेत. भ्रष्टाचार झाल्यावर संबंधितांवर कारवाई करण्याऐवजी तो होवूच न देणे अर्थात भ्रष्टाचार प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर त्यांनी अधिक भर दिला आहे. विविध ३0 विभागांच्या माध्यमातून सिडकोचा कारभार चालतो. यापैकी भ्रष्टाचाराला संधी असणाऱ्या विभागांवर दक्षता विभागाने अधिक लक्ष केंद्रित केले आहे. त्यानुसार अभियांत्रिकी विभागातील कामकाजावर देखरेख ठेवण्यासाठी विशेष कमिटी स्थापन करण्यात आली आहे. एखाद्या कामाला मुदतवाढ किंवा निधी वाढ द्यायची असेल तर या कमिटीची शिफारस बंधनकारक करण्यात आली आहे. त्यामुळे संभाव्य भ्रष्टाचाराला लगाम बसला आहे. त्याचप्रमाणे वसाहत विभागाच्या कार्यपध्दतीतही बदल करण्यात आले आहेत. कोणतीही रखडपट्टी न होता निर्धारित वेळेत लोकांना लागणाऱ्या परवानग्या मिळाव्यात या दृष्टीने नियमावली करण्यात आली आहे. या नियमावलीचे पालन करणे संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना बंधनकारक आहे. भ्रष्टाचाराचे कुरण ठरलेल्या साडेबारा टक्के विभागावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. विभागांतर्गत बदली झाल्यानंतर संबंधित अधिकाऱ्याने आपल्या ताब्यातील प्रलंबित प्रकरणांच्या फाईल्सच्या नोंदी पदभार घेणाऱ्या अधिकाऱ्याकडे देणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे फाईल्स गहाळ होण्याच्या प्रकरणांना आळा बसला आहे.
1माहितीच्या अधिकाराखाली येणाऱ्या अर्जाचे बारकाईने निरीक्षण केले
जाते. अर्जदाराने त्यात नमूद केलेल्या माहितीचा मागोवा घेवून संभाव्य भ्रष्टाचाराला प्रतिबंध घालण्याचा प्रयत्न केला जातो. एकूणच एखादी तक्रार प्राप्त झाल्यावर त्यावर सकारात्मकपणे कार्यवाही केली जाते. येणाऱ्या तक्रारीत अनेकदा तथ्य आढळत नाही. मात्र दखल घेतल्याचे समाधान संबंधित तक्रारदाराला वाटते. याचा परिणाम म्हणून नागरिक आता स्वत:हून पुढे येत आहेत. त्यामुळे भ्रष्टाचारी वृत्तींना चपराक बसली आहे, तर
प्रामाणिक कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढले आहे.
2दक्षता विभागाच्या कामकाजावर सिडको एम्प्लॉईज युनियनचा आक्षेप आहे. चौकशीच्या नावाखाली कर्मचाऱ्यांना वाईट वागणूक दिली जात आहे. मंजूर झालेली पदे न भरता सल्लागार आणि आउट सोर्सिंगसाठी पैशांची उधळपट्टी केली जात असल्याचे आरोप युनियनच्यावतीने केले जात आहे. दक्षता विभागाच्या प्रमुख डॉ. प्रज्ञा सरवदे यांनी या आरोपांचे खंडन केले आहे.
3प्राप्त होणाऱ्या तक्रारींचे निरसन करणे आवश्यक असते. ही चौकशी नियमाच्या अधीन राहून केली जाते. यात संबंधित अधिकारी किंवा कर्मचाऱ्याला कोणत्याही प्रकारचा मनस्ताप होणार नाही, याची काळजी घेतली जाते. त्यामुळे कर्मचाऱ्यांना वाईट वागणूक दिली जाते, असे म्हणणे चुकीचे आहे. मुळात प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी या प्रकरणाचा बागुलबुवा करण्याची काहीच गरज नाही, असे मत डॉ. सरवदे
यांनी व्यक्त केले आहे.
4सध्या सिडकोत पुरेसा कर्मचारी वर्ग नाही. तांत्रिक अडचणीमुळे मंजूर पदे भरण्यास विलंब झाला आहे. अशा स्थितीत सिडकोचे काम थांबविता येत नाही. हे काम सुरळीत चालावे यासाठी सल्लागार व आउट सोर्सिंगचे माध्यम गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.