विकासकामांना सिडकोचा खोडा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2018 01:58 AM2018-08-11T01:58:37+5:302018-08-11T01:58:41+5:30

पनवेल महानगर पालिकेत समाविष्ट असलेल्या सिडको नोडमधील विकासकामे करण्यासाठी सिडकोची परवानगी घेणे बंधनकारक आहे.

CIDCO eroded development works? | विकासकामांना सिडकोचा खोडा?

विकासकामांना सिडकोचा खोडा?

Next

- वैभव गायकर 
पनवेल : पनवेल महानगर पालिकेत समाविष्ट असलेल्या सिडको नोडमधील विकासकामे करण्यासाठी सिडकोची परवानगी घेणे बंधनकारक आहे. मात्र, सिडकोमार्फत या विकासकामांना ना हरकत दाखला देण्यास टाळाटाळ केली जात असल्याने पालिकेची अनेक विकासकामे रखडली आहेत. त्यामुळे विकासकामे करताना महापालिकेसमोर मोठा अडथळा निर्माण झाला आहे.
पनवेल महापालिकेची १ आॅक्टोबर २0१६ रोजी स्थापना झाली. महानगर पालिकेत पूर्वाश्रमीची नगरपरिषद व २९ महसुली गावांसह खारघर, कळंबोली, तळोजा, नवीन पनवेल, कामोठे या सिडको नोडचा देखील समावेश करण्यात आला आहे. सिडकोमार्फत अद्याप हे नोड पालिकेकडे हस्तांतरित झाले नसल्याने सध्याच्या घडीला सिडकोमार्फतच याठिकाणी विविध सेवासुविधा पुरविल्या जात आहेत. खारघर, कळंबोली, कामोठे, नवीन पनवेल आदी सिडको नोडमधून लोकप्रतिनिधी म्हणून नगरसेवक महापालिकेवर निवडून आलेले आहेत. आपल्या प्रभागातील विकासकामांच्या दृष्टीने नगरसेवक विविध विकासकामे करू इच्छित आहेत. याकरिता नगरसेवक स्वत:चा नगरसेवक निधी देखील यासाठी खर्च करण्यास तयार आहेत, परंतु सिडको नोडमधील विकासकामे करण्यापूर्वी सिडको प्रशासनाचा नाहरकत दाखला बंधनकारक आहे. सिडकोमार्फत हा दाखला देण्यास टाळाटाळ केली जात असल्याने अनेक विकासकामे रखडली आहेत. हस्तांतरणाचे कारण पुढे करीत सिडको पनवेल महानगर पालिकेला नाहरकत दाखला देत नाही. याचा परिणाम पालिका हद्दीतील विविध विकासकामांवर होत आहे. पनवेल महानगर पालिकेच्या स्थापनेपासून जवळजवळ ४0 पेक्षा जास्त विकासकामांच्या नाहरकत दाखल्यासाठी पालिका प्रशासनाने सिडकोसोबत पत्रव्यवहार केलेला आहे. मात्र, सिडकोकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा नगरसेवकांचा आरोप आहे.
खारघर शहरातील नगरसेवक नीलेश बाविस्कर यांनी वैयक्तिक पातळीवर पाठपुरावा करून शहरातील एका विकासकामासाठी सिडकोकडून नाहरकत दाखला मिळविला आहे. याकरिता बाविस्कर यांना सिडकोमध्ये मोठ्या प्रमाणात खेटा माराव्या लागल्या. विकासाच्या दृष्टीने अत्यंत सजग असणाऱ्या सिडको प्रशासनामार्फत हा एक प्रकारे विकासकामांमध्ये खोडा घालण्याचा प्रकार आहे.
विशेष म्हणजे या विकासकामांमध्ये अनेक दुरु स्ती कामे, तसेच डागडुजीच्या कामांचा समावेश आहे. दरम्यान, यासंदर्भात सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक व पालिकेचे आयुक्त यांच्या पातळीवर निर्णय घेण्याची आवश्यकता असल्याचे जाणकारांचे मत आहे.
>केवळ
एका कामाला परवानगी
खारघर शहरातील नगरसेवक नीलेश बाविस्कर यांनी वैयक्तिक पातळीवर पाठपुरावा करून शहरातील सेक्टर १५ मधील पुलाच्या डागडुजीच्या कामासाठी सिडकोकडून नाहरकत दाखला मिळविला आहे. अधिकाºयांना विनवणी करून सिडकोमध्ये वारंवार खेटे मारून त्यांनी या विकासकामाकरिता नाहरकत दाखला मिळविला आहे. हे एक काम सोडल्यास अनेक विकासकांच्या नाहरकत दाखल्यांची पालिकेला प्रतीक्षा आहे.
>४0 पेक्षा जास्त कामांना सिडकोच्या नाहरकत दाखल्याची प्रतीक्षा
पनवेल महानगर पालिकेमार्फत नगरसेवक निधी, तसेच पालिकेमार्फत काढण्यात आलेल्या कामांना सिडकोच्या नाहरकत दाखल्यांची प्रतीक्षा आहे. सिडकोमार्फत परवानगी मिळाल्यास ही कामे मार्गी लागू शकतात. पालिकेमार्फत पत्रव्यवहार केलेल्या जवळजवळ ४0 कामांचा यामध्ये समावेश आहे.
>पालिकेत समाविष्ट सिडको नोड अद्याप पालिकेकडे हस्तांतरित झालेला नाही, तर या विकासकामांसाठी नाहरकत दाखला सिडको कसा देणार? केलेल्या कामाची जबाबदारी कोणाची असेल ही देखील महत्त्वाची बाब आहे.
- के. वरखेडकर,
मुख्य अभियंता, सिडको
सिडको नोडमधील विकासकामांकरिता नगरसेवक निधीच्यामार्फत विविध विकासकामे काढण्यात आली आहेत. मात्र, सिडकोच्यामार्फत बºयाच कामांना नाहरकत दाखला मिळाला नाही. या कामांना सिडकोमार्फत नाहरकत दाखला मिळाल्यास अनेक विकासकामे मार्गी लागतील.
- संजय कटेकर,
शहर अभियंता, पनवेल महापालिका

Web Title: CIDCO eroded development works?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.