नवी मुंबई : इंग्लड येथे २७ आणि २८ जुलै रोजी होणाऱ्या ब्रिटिश फायर फायटर चॅलेंज या आंतरराष्ट्रीय स्तरावरील फायर ड्रिल स्पर्धेसाठी सिडकोच्या अग्निशमन दलातील सात जवानांचा चमू लंडनमध्ये दाखल झाला आहे. या स्पर्धेसाठी भारतातून एकमेव सिडकोच्या अग्निशमन दलातील अधिकारी आणि कर्मचाºयांनी भाग घेतला आहे.लंडनमध्ये दाखल झालेल्या या चमूत सिडको अग्निशमन दलातील स्थानिक अधिकारी प्रवीण बाळू बोडखे, एस. एन. पाटील, अग्निशामक भीमा उनवणे, अनंत मोकाशी, नागेश्वर पवार, अक्षय दीपक साठे आणि हेमंत वाघमारे या सात जणांचा समावेश आहे. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र, मुख्य दक्षता अधिकारी विनय कारगांवकर व मुख्य अग्निशमन अधिकारी अरविंद मांडके यांनी या चमूला शुभेच्छा दिल्या. या स्पर्धेमुळे सिडकोच्या अग्निशमन दलाचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचण्यास मदत होईल, असा विश्वास लोकेश चंद्र यांनी व्यक्त केला आहे. भारतीय अग्निशमन सेवेतील अधिकारी व कर्मचाºयांची व्यावसायिक व तांत्रिक गुणवत्ता वाढवून आगीमुळे होणारी जीवित व वित्ताहानी टाळणे, नागरिकामध्ये अग्निशमनविषयी जागरूकता निर्माण करणे हा या स्पर्धेतील सहभागामागील मुख्य उद्देश असल्याचे सिडकोकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
फायर ड्रिलसाठी सिडको अग्निशमन दलाचे जवान लंडनमध्ये दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2018 12:46 AM