लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : सिडको नवी मुंबईसह पनवेलमध्ये पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत महागृहनिर्माण योजना राबवत आहे. या कामांची व्यवस्थापकीय संचालकांनी पाहणी केली. मार्च २०२१ अखेरीस पहिल्या टप्प्यातील घरांचा ताबा देण्यात येणार असून नवीन वर्षात घरांची विक्री करण्याच्या योजना जाहीर करण्यात येणार आहेत.
वाशी ट्रक टर्मिनल, खारघर रेल्वे स्टेशन, खारघर बस टर्मिनल, खारघर बस आगार, कळंबोली बस आगार, पनवेल आंतरराष्ट्रीय बस स्थानक, नवीन पनवेल बस आगार, खारघर सेक्टर ४३, तळोजा सेक्टर २१, २८, २९, ३१ व ३७ येथे महागृहनिर्माण प्रकल्प राबविला जात आहे. सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संजय मुखर्जी यांनी या प्रकल्पांच्या ठिकाणी भेट देऊन कामाची पाहणी केली. परिवहन केंद्रित विकास या संकल्पनेवर आधारित डिसेंबर २०१८ मध्ये हे प्रकल्प सुरू केले आहेत. नवी मुंबई, पनवेल, तळोजा परिसरातील बस डेपो, ट्रक टर्मिनल, रेल्वे स्टेशन परिसरात घरांचे बांधकाम करण्यात येत आहे. चार पॅकेजमध्ये ही योजना राबविली जाणार असून पहिल्या टप्प्यातील घरांचा ताबा मार्च २०२१ देण्याचा मानस आहे.प्रकल्पांचे काम प्रगतिपथावर आहे. सिडकोच्या पाहणी दौऱ्यात डॉ. संजय मुखर्जी यांच्यासोबत के. एम. गोडबोले, संजय चोटालिया व इतर अधिकारी उपस्थित हाेते.