नवी मुंबई : मुंबईतील दुर्घटनेनंतर सिडकोसुद्धा ‘ॲक्शन मोड’मध्ये आली असून आपल्या कार्यक्षेत्रातील अनधिकृत होर्डिंगवर कारवाई सुरू केली आहे. गेल्या तीन दिवसांत उलवे, द्रोणागिरीसह विविध भागांतील दहा ते बारा बेकायदा होर्डिंग जमीनदोस्त करून अधिकृत होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे निर्देश संबंधित विभागाला दिले आहेत.
सिडकोच्या अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाने यापूर्वी अनेकदा अनधिकृत होर्डिंग हटविण्यात आले होते. मात्र, मुंबईतील सोमवारच्या दुर्घटनेनंतर सिडकोने ही मोहीम अधिक तीव्र केली आहे. तसेच याअंतर्गत मागील काही महिन्यांत जवळपास २८ विनापरवाना होर्डिंगवर कारवाई केली आहे. ही मोहीम सुरूच असून अधिकृत होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे निर्देश दिल्याचे सिडकोच्या अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचे प्रमुख तसेच मुख्य दक्षता अधिकारी सुरेश मेंगडे यांनी स्पष्ट केले.