सिडकोची आणखी १ लाख घरे; चार वर्षांत टप्प्याटप्प्याने करणार बांधकाम
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2019 02:40 AM2019-08-24T02:40:12+5:302019-08-24T02:40:26+5:30
परिवहन केंद्रित विकास संकल्पनेवर सिडकोने सध्या ९0 हजार घरांचा प्रकल्प हाती घेतला आहे.
- कमलाकर कांबळे
नवी मुंबई : सर्वसामान्यांसाठी ९0 हजार घरांची घोषणा केल्यानंतर सिडकोने आता आणखी १ लाख १0 हजार घरे निर्माण करण्याचे जाहीर केले आहे. राज्य सरकारने या महागृहनिर्माण योजनेस शुक्रवारी मंजुरी दिल्याची माहिती सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी दिली.
परिवहन केंद्रित विकास संकल्पनेवर सिडकोने सध्या ९0 हजार घरांचा प्रकल्प हाती घेतला आहे. बुधवारी झालेल्या सिडको संचालक मंडळाच्या बैठकीत या घरांच्या निर्मित्तीसाठी तब्बल १९ हजार कोटी रुपये खर्चाला मंजुरी देण्यात आली आहे. त्यानंतर लगेच शुक्रवारी राज्य शासनाने आणखी १ लाख १0 हजार घरे बांधण्याचे निर्देश सिडकोला दिले आहेत. त्यानुसार पुढील चार वर्षांत सिडकोच्या माध्यमातून तब्बल दोन लाख घरांची निर्मित्ती केली जाणार आहे.
सध्या ९0 हजार घरांच्या प्रकल्पावर सिडकाचे काम सुरू आहे. त्यासाठी आवश्यक निधीची तरतूद झाली असून कंत्राटदारांची नेमणूक केली आहे. हा प्रकल्प मार्गी लागल्यावर सिडको १ लाख १0 हजार घरे आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि अल्प उत्पन्न गटासाठी पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत बांधणार आहे. पुढील चार वर्षांत टप्प्याटप्प्याने दोन लाख घरांच्या निर्मितीचे उद्दिष्ट पूर्ण केले जाईल, असे चंद्र यांनी स्पष्ट केले.
९0 हजार घरांसाठी शहरातील रेल्वे स्थानकांचा फोर्ट कोर्ट एरिया, ट्रक टर्मिनल्स, बस डेपो आदी जागा निश्चित केल्या आहेत. मात्र नव्याने घोषणा झालेली घरे शहरातील पडीक व दुर्लक्षित भूखंडांवर बांधण्याचे प्रस्तावित केले आहे.
सर्वसामान्यांना घरे उपलब्ध करून देण्यास सिडको कटिबद्ध आहे. त्यानुसार ९0 हजार घरांच्या निर्मित्तीला सुरुवात झाली आहे. आता यात आणखी १ लाख १0 घरांची भर पडणार आहे. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत ही घरे असणार आहेत. राज्य सरकारने या गृहनिर्मितीला मंजुरी दिली आहे. - लोकेश चंद्र, व्यवस्थापकीय संचालक, सिडको