सिडकोची ३३२२ शिल्लक घरे विक्रीसाठी उपलब्ध; तळोजा, द्रोणागिरीतील सदनिकांचा समावेश

By कमलाकर कांबळे | Published: January 27, 2024 08:13 PM2024-01-27T20:13:45+5:302024-01-27T20:13:57+5:30

सिडकोच्या विविध गृहयोजनेतील हजारो घरे विक्रीविना पडून आहेत.

CIDCO has 3322 remaining houses available for sale Including Flats in Taloja, Dronagiri | सिडकोची ३३२२ शिल्लक घरे विक्रीसाठी उपलब्ध; तळोजा, द्रोणागिरीतील सदनिकांचा समावेश

सिडकोची ३३२२ शिल्लक घरे विक्रीसाठी उपलब्ध; तळोजा, द्रोणागिरीतील सदनिकांचा समावेश

नवी मुंबई: सिडकोच्या विविध गृहयोजनेतील हजारो घरे विक्रीविना पडून आहेत. विशेषत: तळोजा आणि द्रोणागिरी नोडमध्ये सर्वाधिक घरे शिल्लक आहेत. त्यापैकी सिडकोने प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर ३३२२ घरांची नव्याने योजना जाहिर केली आहे. यात द्रोणागिरी नोडमध्ये ४३५ तर तळोजा नोडमध्ये २८८७ घरांचा समावेश आहे. या योजनेतील घरांसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याची मुदत २७ मार्चपर्यंत देण्यात आली आहे. सिडकोच्या माध्यमातून २०१८ ते २०२२ या पाच वर्षाच्या कालावधीत विविध नोडमध्ये विविध घटकांसाठी पंचवीस हजारांपेक्षा अधिक घरांचे बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे.

त्यानुसार वेळोवेळी संगणकीय सोडत काढून काही प्रकल्पातील घरांचे वाटपही करण्यात आले आहे. मात्र तळोजा आणि द्रोणागिरी या दोन नोडमधील घरांना अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. विशेष म्हणजे पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत सर्वाधिक घरे तळोजा नोडमध्ये बांधली आहे. तर आणखी काही घरांचे बांधकाम सुरू आहे. मात्र जुन्या प्रकल्पातीलच घरे विकली जात नसल्याने घरांची नवीन योजना जाहिर करण्यास सिडको धजावत नाही. असे असले तरी तळोजा आणि द्रोणागिरीमधील शिल्लक घरे विकण्यासाठी सिडकोने यापूर्वी सुध्दा अनेक योजना जाहिर केल्या आहेत. मात्र त्यानंतरही घरे शिल्लक राहिल्याने प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर ३३२२ घरांची योजना जाहिर केली आहे. या घरांसाठी आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी वार्षिक उत्पन्न मर्यादा ६ लाख तर सर्वसाधारण घटकासाठी सहा लाखा पेक्षा अधिक उत्पन्न मर्यादा निश्चीत करण्यात आली आहे.
 
नव्या योजनेत उपलब्ध घरांचा तपशील
द्रोणागिरी नोडमध्ये एकूण ४३५ घरे उपलब्ध करण्यात आली आहेत. त्यापैकी ६१ घरे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी तर ३७४ घरे सर्वसाधारण घटकांसाठी आहेत. त्याचप्रमाणे तळोजा नोडमध्ये एकूण २८८७ घरे आहेत. त्यातील २५१ घरे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी तर उर्वरित २६३६ घरे सर्वसाधारण घटकांसाठी आरक्षित असणार आहेत. या योजनेतील घरांसाठी ऑनलाईन नोंदणी २६ मार्चपर्यंत करता येणार आहे. तर ३० जानेवारी ते २७ मार्च या कालावधीत ऑनलाईन अर्ज सादर करता येणार आहेत. या योजनेची संगणकीय सोडत १९ एप्रिल रोजी काढली जाणार असल्याचे सिडकोच्या संबधित विभागाने कळविले आहे.

Web Title: CIDCO has 3322 remaining houses available for sale Including Flats in Taloja, Dronagiri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.