जेट्टीच्या बांधकामात सिडकोने फासला पर्यावरण मंत्रालयाच्या अटींना हरताळ
By नारायण जाधव | Published: May 4, 2024 05:48 PM2024-05-04T17:48:33+5:302024-05-04T17:48:55+5:30
सिडकोच्या या चुकीमुळे येथील फ्लेमिंगोंचे अधिवास असलेला डीपीएस तलाव कोरडा पडून गुलाबी पक्ष्यांचे जे मृत्यू होत आहेत, या पर्यावरणप्रेमींचा आरोपाला पुष्टी मिळून त्यांच्या लढ्याला आणखी बळ मिळाले आहे.
नवी मुंबई : मुंबई ते नवी मुंबई जलवाहतूक सुरू करण्यासाठी सिडकोने पाम बीच मार्गावर नेरूळ येथे जी प्रवासी जलवाहतूक जेट्टी बाधंली आहे, तिचे बांधकाम करताना केंद्रीय वने आणि पर्यावरण मंत्रालयाने घालून दिलेल्या अटी व शर्थींचे पूर्णत: उल्लंघन केल्याचे आणखी पुरावे हाती आहेत.
सिडकोच्या या चुकीमुळे येथील फ्लेमिंगोंचे अधिवास असलेला डीपीएस तलाव कोरडा पडून गुलाबी पक्ष्यांचे जे मृत्यू होत आहेत, या पर्यावरणप्रेमींचा आरोपाला पुष्टी मिळून त्यांच्या लढ्याला आणखी बळ मिळाले आहे.
नेरूळच्या प्रवासी जलवाहतूक जेट्टीसाठी ०.४६ हेक्टर खारफुटी वळविण्यासाठी केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान मंत्रालयाने २५ सप्टेंबर २०१७ रोजी एका पत्रान्वये मंजुरी दिली होती. मात्र, ती देताना सिडको आणि महाराष्ट्र शासनास अनेक अटी व शर्थी घातल्या होत्या.
सिडकोने केल्या या चुका
यात प्रामुख्याने नैसर्गिक ओढे/नद्या/कालव्यांवर पूल/पुलांची रचना त्यांच्या नैसर्गिक प्रवाहाला, मार्गाला बाधा येणार नाही, अशा रीतीने तयार केले जावेत. यामुळे पाणी तुंबणार नाही. तेथील वन्य प्राणी, पक्षी यांच्या हालचालींना अडथळा निर्माण होणार नाही. परंतु, नेरूळ जेट्टीचे बांधकाम करताना यातील अनेक अटींचे उल्लंघन सिडकोने जेट्टीपर्यंतच्या रस्त्याच्या बांधकामामुळे डीपीएस फ्लेमिंगो तलावाकडे जाणाऱ्या मुख्य पाण्याचे प्रवेशद्वार पूर्णत: बुजवल्याचे नॅट कनेक्ट फाउंडेशनने राज्य सरकारच्या निदर्शनास आणले आहे. यामुळे तलाव कोरडा पडून अन्न मिळत नसल्याने गेल्या पंधरवड्यात किमान १० फ्लेमिंगोंचा मृत्यू झाल्याचा दावा नॅट कनेक्टचे संचालक बी. एन. कुमार यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या ताज्या पत्रात केला आहे.
राज्याने घातलेल्या अटींचेही उल्लंघन
केवळ केंद्रीय वने आणि पर्यावरण मंत्रालयच नव्हे तर, महाराष्ट्र शासनाच्या १९ सप्टेंबर २०१८ रोजीच्या शासन निर्णयातील अटींचेही उल्लंघन केले आहे. यातील अटींचे पालन न केल्यास वन (संवर्धन) कायदा, १९८० चे उल्लंघन मानून त्यानुसार कारवाई केली जाईल. यासाठी संबंधित अतिरिक्त प्रधान मुख्य वनसंरक्षक / विभागीय वन अधिकारी हे राज्य सरकारमार्फत केंद्रीय वने आणि पर्यावरण मंत्रालयास अहवाल देतील. यानुसार राज्याने घातलेल्या अटींचेही सिडकोने उल्लंघन केले आहे. नॅट कनेक्टने यापूर्वी सिडकोच्या कार्यकारी अभियंत्याने दाखल केलेल्या हमीपत्राचे कसे तीन-तेरा वाजविले याचाही खुलासा केला आहे.
दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई हवी
पर्यावरण संवर्धनाच्या अटींच्या उल्लंघनाबाबत सागर शक्तीचे संचालक नंदकुमार पवार म्हणाले की, सिडको पर्यावरणाचे सर्व नियम मोडण्यासाठी कुप्रसिद्ध असून, जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईची वेळ आली आहे. तर बीएनएचएसचे उपसंचालक डॉ. राहुल खोत म्हणाले की, रामसर साइट, ठाणे क्रीक फ्लेमिंगो अभयारण्यातील गुलाबी पक्ष्यांचे दुसरे घर म्हणून डीपीएस तलावाचे संवर्धन करणे आवश्यक आहे. फ्लेमिंगो ठाणे खाडीवरून भरती-ओहोटीच्या वेळी उडतात आणि नवी मुंबईच्या डीपीएस तलावात उतरतात. कारण येथे त्यांना खाडीच्या तुलनेत कमी पाणी मिळून अन्न सापडते, असे खोत म्हणाले.