विकासकामांना सिडकोचा खोडा; सर्वसाधारण सभेत पडसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2019 11:40 PM2019-06-19T23:40:17+5:302019-06-19T23:40:25+5:30

पनवेलच्या सर्वपक्षीय नगरसेवकांचा संताप

CIDCO hoard development works; Fall in general meeting | विकासकामांना सिडकोचा खोडा; सर्वसाधारण सभेत पडसाद

विकासकामांना सिडकोचा खोडा; सर्वसाधारण सभेत पडसाद

Next

पनवेल : पनवेल महानगर पालिका क्षेत्रातील सिडकोच्या आडमुठ्या धोरणामुळे नोडच्या विकासाला खो बसला आहे. नोडमधील अनेक कामे रखडली आहेत. ही कामे मार्गी लावण्यासाठी तातडीने हे नोड्स महापालिकेने हस्तांतरित करून घ्यावीत, असा आग्रह सर्वपक्षीय नगरसेवकांनी धरला आहे. सिडको नोडमधील रखडलेल्या विकासकामांच्या मुद्द्यावर बुधवारी झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत चर्चा झाली. या सभेत सिडकोच्या आडमुठ्या धोरणावर सर्वपक्षीय नगरसेवकांनी संताप व्यक्त केला.
0
सिडको नोडमधील समस्यांबाबत सर्वपक्षीय नगरसेवकांची एकत्रित बैठक सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक यांच्यासोबत घेण्याच्या सूचना सभागृह नेते परेश ठाकूर यांनी यावेळी केली. सत्ताधारी पक्षाचे स्थानिक आमदार सिडकोचे अध्यक्ष आहेत. त्यानंतर सुद्धा विकासकामे होत नाहीत, असा टोला लगावत राष्ट्रवादी काँॅग्रेसचे नगरसेवक सतीश पाटील यांनी सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. प्रशांत ठाकूर हे सिडकोचे अध्यक्ष आहेत. ते या विषयावर गप्प का? असा प्रश्न यावेळी राष्ट्रवादीच्या सदस्यांनी उपस्थित केल्याने सभागृहात काही काळ गोंधळ निर्माण झाला. भाजपचे नगरसेवक समीर ठाकूर यांनी राष्ट्रवादीचा सिडको अध्यक्ष असताना किती कामे झाली असा प्रतिप्रश्न केला. पालिका क्षेत्रातील धोकादायक इमारती,गरजेपोटी घरे, गावठाणातील मोडकळीस आलेल्या घरांच्या दुरु स्तीच्या परवानगीचा रखडलेला विषय नगरसेवक गुरु नाथ गायकर यांनी उपस्थित केला. सध्याच्या घडीला गावठाणातील घरांचा सर्व्हे झाला नसल्याने ग्रामस्थांना मोडकळीस आलेल्या घरांच्या दुरु स्तीसाठी महापालिका परवानगी देत नसल्याची बाब गायकर यांनी यावेळी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. मोडकळीस आलेल्या घरांच्या दुरुस्तीसाठी महापालिका परवानगी देईल, परंतु दुरुस्तीच्या नावाखाली टोलेजंग इमारती उभारल्या गेल्यास त्यावर कारवाई केली जाईल, असे महापालिका आयुक्त डॉ. गणेश देशमुख यांनी यावेळी स्पष्ट केले. नगरसेवक जगदीश गायकवाड यांनी देखील पावसाळापूर्वी नालेसफाईची कामे पूर्ण करण्याची मागणी केली.

कळंबोली बॉम्ब घटनेचे पडसाद यावेळी सभागृहात उमटले. नगरसेवक सतीश पाटील यांनी अशाप्रकारे घटनांवर पालिकेचे लक्ष असणे गरजेचे असल्याचे सांगितले. असे प्रकार पालिका क्षेत्रात घडत असतील तर पालिकेच्या मार्फत देखील गोष्टीवर लक्ष ठेवण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित करणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. स्टील मार्केटमधील व्यापाऱ्यांना एलबीटी कर भरण्याची दिलेली सूट कोणत्या आधारावर दिली असा प्रश्न नगरसेवक हरेश केणी यांनी यावेळी उपस्थित केला. एलबीटीमधील सूट हा शासनाने दिलेला निर्णय असल्याने या विषयावर अभ्यास करून पुढील सभेत उत्तर दिले जाईल असे आयुक्तांनी सांगितले.

स्थायी समितीत आठ नवे सदस्य
स्थायी समितीमधील आठ सदस्यांची मुदत संपुष्टात आल्याने आठ नव्या नावांची यादी सभागृह नेते परेश ठाकूर व विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी आयुक्तांकडे सुपूर्द केली यामध्ये शेकापचे दोन सदस्य आहेत.
विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे व काँग्रेसच्या भारती चौधरी यांचा समावेश आहे. तर भाजपने दिलेल्या सहा नावांमध्ये परेश ठाकूर, प्रवीण पाटील, मोनिका महानवर, संतोषी तुपे, अजय बहिरा, मुकीत काझी यांचा समावेश आहे.

नगरसेवकांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे : आपत्कालीन परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी नगरसेवकांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे नागरिक संरक्षण विभागाच्या मार्फत देण्यात आले. यावेळी आपत्कालीन परिस्थितीशी कशाप्रकारे दोन हात करायचे याचे प्रात्यक्षिक देण्यात आले.

वृक्ष प्राधिकरण समितीवर आरोप
पालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वृक्षांची कत्तल केली जाते. जाहिरातीच्या फलकासाठी झाडांची कत्तल केली जाते. कळंबोलीमध्ये नुकताच एक प्रकार उघडकीस
आला आहे. यासंदर्भात चौकशीची मागणी करत वृक्ष प्राधिकरण समिती करते तरी काय ? असा प्रश्न नगरसेवक अमर पाटील यांनी उपस्थित केला.

Web Title: CIDCO hoard development works; Fall in general meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :cidcoसिडको